जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२६ । जळगाव महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता आज ८ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी रोड शो आयोजित केला आहे. आज दुपारी १ वाजता हा रोड शो होणार असून जवळपास ३००० मीटरचा रोड शो असणार आहे. त्यासाठी किमान चार तास लागण्याचा अंदाज असून रोड शो जसजसा पुढे जाईल तसतसे रस्ते वाहतुकीला बंद केले जाणार आहेत.

राज्यातील २९ महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रमुख नेत्यांकडून राज्यभरात प्रचाराचा झंझावात पाहायला मिळत आहे. दोन दिवसापूर्वीच जळगाव शहरात महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो आयोजित करण्यात आला होता. यानंतर आज उपमुख्यमंत्री शिंदे यांचा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ३००० मीटरचा रोड शो आयोजित केला आहे.

असा असणार ‘रोड शो’चा मार्ग
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या रोड शोला गुरुवारी दुपारी एक वाजता कोर्ट चौकातून सुरुवात होईल. सरळ चित्रा चौक, सुभाष चौक, घाणेकर चौकमार्गे लालबहादूर शास्त्री चौक ओलांडून नेहरू चौकातून रेल्वे स्थानकाकडे रवाना होईल. येथे उपमुख्यमंत्री शिंदे डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून रोड शोचा समारोप करतील.

येथे रोखणार वाहतूक
रोड शो मार्गावरील पहिला चौक चित्रा चौक, पुष्पलता बेंडाळे चौकातून येणारी वाहतूक भंगाळे गोल्ड येथे रोखली जाईल. सुभाष चौकात सराफ बाजार व दाणाबाजार येथून येणारी वाहतूक थांबवण्यात येईल. घाणेकर चौकात शनिपेठ, वाल्मीक नगरकडून येणारी वाहतूक रोखली जाईल. टॉवरपासून उपमुख्यमंत्र्यांचे वाहन पुढे जाईल तोपर्यंत शिवाजीनगर व जुने बसस्थानकाकडून येणारी वाहने रोखण्यात येतील. पुढे रेल्वे स्थानकाकडे जाताना गोविंदा रिक्षा स्टॉप येथे वाहतूक रोखली जाईल, असे वाहतूक शाखेचे निरीक्षक पवन देसले यांनी सांगितले.
बंदोबस्तासाठी ५०० पोलिस
मुख्यमंत्र्यांच्या रोड शोसाठी ५०० पोलिसांचा बंदोबस्त १७०० मीटर अंतरात तैनात करण्यात आला होता. तेवढाच बंदोबस्त उपमुख्यमंत्री शिंदेंच्या रोड शोसाठी असेल. प्रत्येक चौकात पोलिसांची सूक्ष्म नजर राहील, असे उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांनी सांगितले.



