जळगाव लाईव्ह न्यूज । महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीला या योजनेवरुन अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. ही योजना फसवी आहे, सरकार पैसे देणार नाही, निवडणुकीनंतर योजना बंद करण्यात येईल, असे प्रश्नचिन्ह उपस्थित करत या योजनेवर विरोधीपक्षाकडून जोरदार टीका करण्यात आली. मात्र महिलांमध्ये या योजनेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्याने विरोधी पक्षातील नेत्यांकडून या योजनेबाबत रणनीत बदलली आहे.
महाराष्ट्रातील सध्या सर्वात लोकप्रिय योजनांपैकी एक योजना म्हणजे, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना होय. सुरुवातीला ही योजना म्हणजे जुमला आहे अशी टीका झाली. परंतू महिलांनी त्याकडे लक्ष न देता सरकारवर विश्वास ठेवत नाव नोंदणी केली. या योजने अंतर्गत आतापर्यंत दीड कोटीहून अधिक महिलांनी नोंदणी केली आणि त्यांना ऑगस्ट महिन्यापासून प्रतिमा दीड हजार रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली. लाडकी बहिण योजन महिलांमध्ये लोकप्रिय होत असल्याचे पाहून विरोधकांनीही आपली रणनीती बदलत योजनेवर थेट टीका न करता राज्याच्या आर्थिक स्थितीवर बोलण्यास सुरुवात केली आहे.
योजनेची बदनामी करण्याचे सर्व प्रयत्न फेल
लाडकी बहीण योजनेची रक्कम अदा करण्यासाठी राज्य सरकारकडे पैसेच नाहीत त्यामुळे दर आठवड्याला तीन हजार कोटी रुपयांचे कर्ज सरकार काढत आहे अशी टूम सोडून देण्यात आली. मात्र अर्थमंत्री अजित पवार यांनी या बातम्यांचे खंडन केले. या योजनेसाठी अर्थसंकल्पात तब्बल 46 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले. त्यानंतर राज्य सरकारकडे ठेकेदारांचे पैसे देण्यासाठी शिल्लक नाही त्याचा परिणाम राज्याच्या विकासावर होणार आहे, अशी आवई उठवण्यात आली. मात्र त्याचाही काहीच परिणाम झाला नाही. त्यानंतर विरोधकांकडून नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. दीड हजार रुपये देऊन सरकार महिलांची मते विकत घेऊन इच्छित आहे असे भासवण्यात येऊ लागले. परंतू महिलांनी विरोधकांच्या या खेळीकडेही लक्ष दिले नसल्याचे दिसून येते.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे विरोधकांना प्रतिउत्तर
निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांनी या योजनेला सर्वाधिक लक्ष करण्याचे ठरविले आहे. योजनेच्या लाभाचे पहिले दोन हप्ते अदा करण्यात आल्यानंतर जमा झालेले पैसे ताबडतोब काढून घ्या नाहीतर सरकार तुमचे पैसे स्वतः काढून घेईल अशी भीती दाखविण्यात आली. मात्र विरोधकांच्या अफवांना उत्तर देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी कोणत्याही परिस्थितीत हे पैसे परत घेतले जाणार नाहीत, सरकारने महिलांना दिलेली ही ओवाळणी आहे आणि ओवाळणी परत घेतली जात नाही असे स्पष्ट केले.
योजना निवडणुकीनंतरही सुरुच राहणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने निवडणूक काळात महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यास मनाई केली आहे. ही स्थगिती तात्पुरती आहे. मात्र असे होवू शकते, याची जाणीव राज्य सरकारला असल्याने त्यांनी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यावर आधीच जमा केला आहे. सदर योजना निवडणुकीनंतरही सुरुच राहणार आहे पण फक्त निवडणूक आयोगाच्या सूचनामुळे या योजनेच्या अंमलबजावणीस स्वल्पविराम मिळाला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकार सत्तेत आल्यास ही योजना पुन्हा पूर्वीच्याच गतीने पात्र लाभार्थी महिलांना लाभ देणे सुरू ठेवणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.