अभिनव शाळेसमोर गतीरोधक लावण्याची मागणी
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२१ । चाळीसगाव शहरातून जाणाऱ्या भडगाव रोडवर दररोज लहान-मोठे अपघात रोज होत असून विद्यार्थी व नागरिकांना आपला जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे, त्यामुळे अभिनव शाळेसमोर तात्काळ गतिरोधक टाकण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
चाळीसगाव शहरातून जाणाऱ्या भडगाव रोडचे काम नव्यानेच झाले आहे. त्यामुळे या रोडवर वाहनांचा वेग खूप जास्त असतो. शहरातून जाणारा वाहतुकीचा हा मुख्य रस्ता असल्यामुळे या रस्त्यावर वाहनांची संख्या जास्त असते. दोन्ही बाजूने वाहने सुसाट असतात. अभिनव शाळेसमोर मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. शाळेचे विद्यार्थी, या ठिकाणी भरत असलेला भाजी बाजार, नागरिकांची ये-जा आणि अन्य दुकाने यामुळे या शाळेसमोर मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी असते. लोकांना मुठीत जीव धरून रस्ता ओलांडावा लागतो. त्यामुळे या ठिकाणी लहान-मोठे अपघात रोज होत असतात. या ठिकाणी गतिरोधक नसणे म्हणजे भविष्यात मोठ्या अपघाताला आमंत्रण आहे. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या अपघातांचा धोका टाळण्यासाठी याठिकाणी लवकरात लवकर गतिरोधक टाकण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मागणीकडे होतेय दुर्लक्ष
गेल्या एक वर्षापासून या ठिकाणी गतिरोधक टाकण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र, वारंवार मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. संबंधित विभागाने व लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष घालून हा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा, अशी मागणी देखील नागरिकांकडून होत आहे.