जळगाव लाईव्ह न्यूज|३० जुलै २०२३| जळगाव जिल्ह्यातील केळीला देशात मोठ्या प्रमाणावर मागणी असते. परंतू या वर्षी सारखी मागणी आजगायात नव्हती आखाती देशात जिल्ह्यातील केळीला अजूनही असलेली मोठी मागणी, यावर्षीची निर्यात क्षमता, केळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन यामुळे यापूर्वी कधी नव्हते. जुलैमध्ये जिल्ह्यातून केळीची निर्यात अजूनही सुरू आहे. ऑगस्टमध्येही जिल्ह्यातून केळी निर्यात होणार असल्याचे चांगले चित्र यंदा निर्माण झाले. या वर्षी जिल्ह्यातून विक्रमी म्हणजे सुमारे एक हजार ८०० कंटेनर्स (३६ हजार टन) केळी निर्यात होण्याची अपेक्षा आहे. शासनाने कोल्ड स्टोअरेज उपलब्ध करून दिल्यास एका वर्षातच ही निर्यात पाचपटींपेक्षा जास्त म्हणजे १० हजार कंटेनर्सपर्यंत पोचेल, असे केळी निर्यातदार शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
सामान्यपणे पाऊस सुरू झाला, की केळीची आखाती देशातील निर्यात थांबते. या वर्षी मात्र आखाती देशात खानदेशी केळीला अजूनही मोठी मागणी आहे. या वर्षी थंडीत केळीला चिलिंग समस्येला फारसे तोंड द्यावे लागले नाही.आंध्र प्रदेशातील केळीचा हंगाम लवकर संपला. जिल्ह्यात सातत्याने निर्यातक्षम केळी उपलब्ध राहिली आणि केळी निर्यातीतील प्रतिस्पर्धी देश इक्वेडोरमध्ये केळीचा दर्जा घसरण्याचा फायदा जिल्ह्यातील केळीला मिळाला आणि गेल्या वर्षापेक्षा सुमारे ३०० ते ४०० कंटेनर्स जास्त केळीची निर्यात जिल्ह्यातून होऊ घातली आहे. मध्यंतरी केळीचे भाव अडीच ते तीन हजार रुपयांपर्यंत पोचल्याने त्याचा निर्यातीवर थोडासा परिणाम झाला; पण नंतर निर्यातीने सातत्य राखले आहे. तालुक्यातील अटवाडे येथील विशाल अग्रवाल यांच्या रुची बनाना एक्स्पोर्टने यावर्षी ४५० पेक्षा जास्त कंटेनर्स आणि तांदलवाडी येथील प्रेमानंद महाजन आणि प्रशांत महाजन यांच्या महाजन बनाना एक्स्पोर्टने ३५० पेक्षा जास्त कंटेनर्स निर्यात केले आहेत.
याशिवाय, अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी आणि खासगी कंपन्यांनी ३० ते ५० कंटेनर्स केळी निर्यात केली आहे. म्हणजे जिल्ह्यातील एकूण केळी निर्यातीत रावेर तालुक्याचा वाटा हा ६० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. रावेर तालुक्याशिवाय यावर्षी यावल, मुक्ताईनगर, चोपडा इतकेच नव्हे, तर जामनेर, चाळीसगाव आदी तालुक्यांतूनही केळी निर्यात झाली आहे.केळी निर्यातीच्या इतिहासात यापूर्वी जुलैमध्ये कधीही केळीची निर्यात झाली नव्हती. सध्या जिल्ह्यातून या महिन्यातही रोज चार ते पाच कंटेनर्स केळीची निर्यात सुरू आहे. इतकेच नव्हे, तर ऑगस्टमध्येही निर्यात सुरू राहणार असल्याचे रुची बनाना एक्स्पोर्टचे संचालक विशाल अग्रवाल यांनी सांगितले.
शासनाकडून सुविधांची अपेक्षाशासनाने केळी निर्यातीसाठी फक्त २० ते २५ कोटी रुपये उपलब्ध करून दिले तरी वर्षभरातच केळीची निर्यात पाच पटींनी म्हणजे सुमारे १० हजार कंटेनर्स इतकी होऊ शकेल. भुसावळ- रावेरदरम्यान प्रत्येकी दोन हजार टन क्षमतेचे दोन कोल्ड स्टोअरेज (यांचा अपेक्षित खर्च सुमारे १० कोटी रुपये इतका आहे) शासनाने उभारण्याची आवश्यकता आहे.
आखाती देशात दर आठवड्याला केळी घेऊन एक जहाज जाते. एका जहाजात मावेल इतका केळीमाल आठवडाभर कुठे साठवणार आणि त्याची कमीत कमी भाड्यात मुंबईपर्यंत वाहतूक कशी होणार, ही निर्यातीतील मूळ समस्या आहे. कोल्ड स्टोअरेज उभारून त्यात ठेवलेले कंटेनर्स मुंबईपर्यंत रेल्वेने वाहतुकीची व्यवस्था झाली तर जिल्ह्याला, जिल्ह्यातील केळीला खरंच सोन्याचे दिवस येतील.केळीच्या फ्रूट केअरसाठी सुमारे पाच कोटी रुपयांचे अनुदान अपेक्षित आहे. कोल्ड स्टोअरेज आणि फ्रूटकेअर असे दोन्ही मिळून सुमारे २० ते २५ कोटी रुपये शासनाकडून उपलब्ध झाल्यास केळी निर्यातीत प्रचंड वाढ होऊ शकते. मात्र, याकडे जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांनी, दोन्ही खासदारांनी आणि सर्वच आमदारांनी लक्ष द्यावे, अशी अपेक्षा आहे.