दीपस्तंभ मनोबलच्या अनाथ विद्यार्थ्याची महापारेषणच्या सहाय्यक अभियंता पदी निवड
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ फेब्रुवारी २०२३ । महापारेषणाच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत दीपस्तंभ मनोबलचा अनाथ विद्यार्थी मयूर भावेची सहाय्यक अभियंता पदी निवड झाली आहे. अनाथ संवर्गातून सहाय्यक अभियंता पदी मयूरची निवड झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून मयूर मनोबलच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होता.
मयूर औरंगाबादचा असून लहानपणीच त्याचे आई वडील वारले आहेत. आजी आजोबांनी मयूरचा सांभाळ करत त्याचे शिक्षण पूर्ण केले. औरंगाबादच्या शासकीय तंत्र निकेतन मधून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगच शिक्षण त्याने पूर्ण केले. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याच्या दृष्टीने मनोबल या प्रकल्पात गेल्या दोन वर्षांपासून त्याने प्रवेश घेतला होता.पगारीया ऑटोचे पुखराज पगारिया यांनी निवासी शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी मयुरचे पालकत्व स्वीकारले होते. मनोबल प्रकल्पातील अनाथ मुलांच्या उच्च शिक्षण व प्रशिक्षणासाठी पगरिया फाउंडेशन सातत्याने योगदान देत आहे.
महाराष्ट्रातल्या १८ वर्षावरील अनाथ मुलांसाठी दीपस्तंभ मनोबल मध्ये २०१६ पासून निवासी प्रशिक्षण सुरु केल आहे. शासनाने एक टक्का आरक्षण दिलेल आहे. मात्र त्याचा फायदा होण्यासाठी या विद्यार्थ्यांना गुणवत्तेच निवासी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. ती गरज महाराष्ट्रातल्या अनाथ विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ भागविण्याचा प्रयत्न करत आहे. मयुर अत्यंत गुणी आणि मेहनती मुलगा आहे.त्याला मिळालेल्या यशा बद्दल त्याचे मनपूर्वक अभिनंदन.या यशात सर्वात महत्वाचा वाटा त्याने सातत्याने केलेल्या कष्टाचा आहे असे प्रतिपादन दीपस्तंभचे यजुर्वेंद्र महाजन यांनी केले. संस्थेचे मार्गदर्शक प्राचार्य सुनीलकुमार लवटे , प्राचार्य निळकंठराव गायकवाड, संस्थेचे संचालक डॉ. रुपेश पाटील यांनी मयूरचे अभिनंदन केले आहे.