जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२१ ।धरणगाव तालुक्यातील बोरगाव येथील गेल्या आठवड्यापासून बेपत्ता असलेल्या वायरमन तरुणाचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ज्ञानेश्वर कृष्णा चव्हाण (२३) असे या तरुणाचे नाव आहे.
ज्ञानेश्वर चव्हाण हा युवक एरंडोल येथे वीज महावितरण कंपनी त जवळपास ३ वर्षांपासून झिरो वायरमन म्हणुन काम करीत होता. तो जवळपास सात आठ दिवसापूर्वी घरुन निघाला होता.तो आज येईल उद्या येईल म्हणुन आई वडिलांसह घरातील इतर लोक वाट पाहत असताना शनिवारी सकाळी पद्मालय च्या जंगलात दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली.हे वृत्त कळताच ज्ञानेश्वर च्या आई वडिलांनी व कुटुंबातील सदस्यांनी हंबरडा फोडला.विशेष हे की त्याचे प्रेत कुजलेल्या स्थितीत आढळून आले.त्याने आत्महत्या पाच ते सहा दिवसांपुर्वी केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक कयास आहे.याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
एरंडोल पोलीस स्टेशन सूत्रांनी दिलेली माहिती अशी की कुजलेल्या मृतदेहाची दुर्गंधी परिसरात पसरल्याची माहिती पद्मालय व गलापुर् येथील ग्रामस्थांना कळल्यावर त्यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला याबाबत कळविले.त्याठिकाणी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव,सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे,संदिप सातपुते,अकील मुजावर,जुबेर खाटीक,संदिप पाटील यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले.त्यावेळी गलापूर् चे माजी सरपंच शेख आरिफ पठाण,उपसरपंच पद्मालय अर्जुन मोरे,आबा वाणी यांनी घटनास्थळी पोलिसांना सहकार्य केले.
दरम्यान प्रेत अशा ठिकाणी होते ज्याठिकाणी कोणीही जाऊ शकत नव्हते.पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव हे स्वतः खाली उतरत असताना दरीत कोसळताना बाल बाल वाचले.त्यांना आबा वाणी यांनी सहारा देऊन वाचवले.यावेळी पंचनामा करण्यात आला.मृताच्या खिशात दुचाकीची चावी,मोबाईल,पाकीट व ओळखपत्र मिळुन आले.ग्रामीण रुग्णालयातील डॉ.मुकेश चौधरी यांनी जागेवरच शवविच्छेदन केले.ज्ञानेश्वर हा अविवाहित होता.त्याच्या पश्चात आई,वडील,भाऊ व बहीण असा परिवार आहे.
पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल जुबेर खाटीक व अकील मुजावर हे पुढील तपास करीत आहेत.