⁠ 
शनिवार, मे 4, 2024

खुशखबर ! खाद्य तेलाच्या भावात आणखी घसरण

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ सप्टेंबर २०२१ ।  खाद्यातेलाच्या किंमती मागील अनेक महिन्यापासुन गगनाला भिडल्या आहेत. तेलाच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडले आहे. आता सर्वसामान्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

तेलाच्या वाढत्या किमतीमुळे त्रासलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं घेतलेल्या कर कपातीच्या निर्णयामुळे खाद्य तेलाच्या किमतीत घट झाली आहे. याशिवाय घरगुती पुरवठा वाढवण्यासाठी आणि साठेबाजीला आळा घाण्यासाठीही सरकारनं काही महत्त्वाचे निर्णय घेतले होते. देशात आठ प्रकारच्या खाद्य तेलाच्या किमतीत गेल्या आठवड्याच्या तुलनेत यावेळी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव जसा वाढला तसे तेलाचे भावही सातत्याने वाढत होते. कोरोनाची दुसरी लाट साधारणत: जानेवारी ते फुब्रुवारीच्या दरम्यान आली. त्या कालावधीत शेंगदाणा तेल 20 ते 25 तर सोयाबीन तेलाचे भाव 40 ते 50 रुपयांनी वाढले. भावात होणारी ही उड्डाणे पाहून अनेकांचे स्वयंपांक गृहाचे बजेट बिघडले होते. जे लोक 10 ते 15 किलोची पॅकिंग असलेले तेलाचे डबे घ्यायचे ते 2 ते 5 किलो तेल किराणा दुकानातून खरेदी करायचे. कधी नव्हे, इतके खाद्यतेल महाग झाल्याने अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. अर्थात, तेलाचे भाव कधी कमी होतात? याकडे सर्वसामान्यांच्या नजरा खिळल्या होत्या. आता भाव कमी झाल्याने हायसे वाटले आहे. परंतु, असे असले तरी सध्या जे दर आहेत ते आणखी कसे कमी होतील? याकडे किचन बजेट सांभाळणार्‍या गृहिणींचे लक्ष आहे.

दरम्यान, केंद्राकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार देशात १४ सप्टेंबर रोजी शेंगतेल, मोहरीचे तेल, वनस्पती तेल, सनफ्लावर, पाम तेल, नारळ तेल आणि तिळाच्या तेलाच्या किमतीत घट नोंदविण्यात आली आहे. १४ सप्टेंब रोजी पाम तेलाचा दर २.५० टक्क्यांच्या घटीसह १२,३४९ रुपये प्रतिटन इतका नोंदवला गेला. एका आठवड्यापूर्वी हाच दर १२, ६६६ रुपये इतका होता.

तिळाच्या तेलाच्या दरात २.०८ टक्क्यांनी घसरण झाली आहे. तर नारळ तेल १.७२ टक्क्यांनी स्वस्त झालं आहे. सनफ्लावर ऑइलचा १४ सप्टेंबर आधी १६,१७६ रुपये प्रतिटन इतका होता. आता त्यात १.३० टक्क्यांची घट झाली असून १५,९६५ रुपये प्रतिटन इतका झाला आहे. तेलाच्या घाऊक दरात झालेल्या घटीचे पडसाद किरकोळ बाजारातही पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना ऐन सणासुदीच्या काळात मोठा दिलासा मिळणार आहे.