⁠ 
शनिवार, एप्रिल 13, 2024

शेतात काम करताना आई-वडिलांना तहान लागली, मुलगा विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेला पण..

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२३ । पाचोरा तालुक्यातील आर्वे गावानजीकच्या शेतशिवारात एक दुर्दैवी घटना घडलीय. शेतात काम करताना आई-वडिलांना तहान लागली म्हणून मुलगा शेजारी असलेल्या एका विहिरीत आणायला गेला. बादलीने विहिरीतून पाणी काढत असताना त्याचा अचानक तोल गेला व तो विहिरीत पडला. यात विहिरीत बुडून समाधान उर्फ बाळू वना पाटील (वय – २३ रा, आर्वे फाटा ता. पाचोरा ) या तरुणाचा मृत्यू झाला.

अंतुली येथील मूळ रहिवासी असलेले वना मोतीराम पाटील हे आर्वे फाटा याठिकाणी कुटुंबासह वास्तव्यास असून ते आर्वे गावानजीक असलेल्या डॉ. संघवी यांच्या शेतात गेल्या २० वर्षापासून वना मोतीराम पाटील हे कुटुंबासह मोलमजुरी करुन आपला उदरनिर्वाह करत आहेत. रविवारी सकाळी वना पाटील हे पत्नी प्रतिभा व समाधान व अमोल या मुलांसह नेहमीप्रमाणे शेतात काम करण्यासाठी गेले होते. यादरम्यान, दुपारी वना पाटील व त्यांच्या पत्नी प्रतिभा पाटील यांना तहान लागली. त्यांनी मुलगा समाधान यास शेजारीत बोहरी यांच्या शेतातील विहिरीतून पाणी आणण्यास सांगितले. त्यानुसार समाधान हा विहिरीवर पाणी घेण्यासाठी गेला होता.

समाधान हा बादलीने विहिरीतून पाणी काढत असताना त्याचा अचानक तोल गेला व तो विहिरीत पडला. याचदरम्यान बाजूच्या शेतात काम करणाऱ्या त्याच्या आई-वडिलांना तसेच भावाला विहिरीच्या दिशेने मोठा आवाज आला. त्यामुळे तिघांनी विहिरीकडे धाव घेतली. विहिरीजवळ गेल्यावर तिघांना समाधान हा विहिरीत पडल्याचे दिसून आले. त्यानंतर समाधान यास बाहेर काढण्यासाठी समाधानचा भाऊ अमोल व त्याचे वडील वना पाटील या दोघांनी विहिरीत दोर सोडला, मात्र सोडलेला दोर समाधानच्या हाताला लागला नाही. समाधानचे वडील हे आरडाओरड करत होते, मात्र बाजूच्या शेतात कुणीच नव्हते. भाऊ व वडिलांचे प्रयत्न अपयशी ठरले व काही क्षणात समाधान हा विहिरीत बुडाला.

याप्रकरणी पाचोरा पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक हरिष अहिरे हे करत आहेत. आई-वडील व भावाच्या डोळ्यांदेखत तरुण बुडाल्याच्या या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्‍त केली जात आहे.