⁠ 
रविवार, मे 19, 2024

तीन महिन्यापूर्वी विवाह झालेल्या २२ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; मृत्यूबाबत संशय

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जून २०२२ । २२ वर्षीय विवाहितेने घराच्या छताला दाेर बांधून गळफास घेत आत्महत्या केली. मात्र, मुलीचे निधन झाल्यानंतर घरी असलेले सासरे व नणंद हे पसार झाले. यामुळे तिला अगोदर फाशी दिली व नंतर दोर बांधून छताला लटकवले गेले. यामुळे सासरच्या मंडळींनी तिचा खून केल्याचा संशय असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मृत मुलीच्या आई-वडिलांनी पोलिसांकडे केली आहे. ही घटना पाचोरा तालुक्यातील गाळण बुद्रुक येथे घडली. दरम्यान, तीन महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या विवाहितेचा दाेन लाख रुपयांसाठी मानसिक व शारिरीक छळ हाेत असल्याचा आराेप यावेळी नातेवाइकांनी केला.

धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथील सुवर्णा (वय २२) हिचा पाचाेरा तालुक्यातील गाळण येथील योगेश चुडामन पाटील यांच्याशी १९ फेब्रुवारी २०२२ रोजी विवाह झाला. योगेश नाशिक येथे कंपनीत नाेकरीस असून त्याच्या भावाचे व त्याचे नाशिक येथे दोन मेडिकल आहेत. मुलीचे वडिल सूर्यभान सीताराम पाटील यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असुन ते सालदारकी करतात. आई अनिता पाटील मजुरी करतात. मुलगा नाेकरीला असल्यामुळे त्यांनी ७ लाख रुपये हुंडा कबूल केला. कर्ज काढून विवाहाप्रसंगी त्यापैकी ५ लाख रुपये रोख दिले. त्यानंतर माहेरहून २ लाख रुपये आणण्यासाठी तिला सतत शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याचे सुवर्णा ही माहेरी आल्यानंतर तसेच फाेनद्वारे सांगत हाेती. दरम्यान, १ जूनला रात्री ७ वाजता आईने सुवर्णास फोन केला. त्यावेळी माझी नणंद एक महिन्यापासून येथे आली असून ती २ लाखांसाठी माझ्याशी सतत भांडत असल्याचे सुवर्णा हिने आईला सांगितले. दुसऱ्या दिवशी अर्थात दि. २ रोजी आईने सकाळी १० वाजता पुन्हा सुवर्णाला फोन लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचा फोन बंद होता. यानंतर तासाभरातच सुवर्णाच्या जेठाने फोन करुन सुवर्णाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आईला कळवले. दरम्यान, घराचा दरवाजा आतून बंद हाेता. तर शेजारच्या लहान मुलाने आवाज देण्याचा प्रयत्न केला असता सुवर्णा यांचा प्रतिसाद मिळत नसल्याने मुलाने खिडकीतून पाहिले असता त्यांचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याची गावात चर्चा हाेती.

इन कॅमेरा पाेस्टमार्टम करण्याची मागणी …

मृत सुवर्णा पाटील यांची महिला तहसीलदारांनी तपासणी करावी, अशी मागणी आई-वडील व नातेवाइकांनी केल्याने जळगावच्या तहसीलदार दीपाली केदारे यांनी पाहणी केली. यानंतर नातेवाइकांनी शवविच्छेदन इन कॅमेरा करण्याचा हट्ट धरला. मात्र, जळगाव येथील शवविच्छेदन करणाऱ्यांनी रात्री शवविच्छेदन होत नसल्याचे सांगितल्याने सुवर्णाचा मृतदेह रात्रभर पाचोरा ग्रामीण रुग्णालयात राहणार आहे. सुवर्णाच्या माहेरचे नातेवाइक खुनाचा गुन्हा दाखल करण्यावर ठाम असल्याने आज गुन्हा दाखल झाला नाही. या वेळी पाचोरा येथील निवासी नायब तहसीलदार संभाजी पाटील उपस्थित होते.

पती नाशिकला तर सासू हाेती गावाला

सुवर्णाचा जेठ मोहन पाटील हा नाशिक येथे राहताे. त्याचा अपघात झाल्याने तो तेथील ओखार्ड हाॅस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. तर त्याचा भाऊ योगेश हा देखील देखभालीसाठी गेला आहे. सुवर्णाची सासू दोन दिवसांपासून बाहेरगावी गेली आहे. तर सासरे चुडामण पाटील हे पाचोरा येथे सूर्यफूल विकण्यासाठी गेल्याचे सांगण्यात आले. घटनेप्रसंगी सुवर्णा व तिची नणंद या दोन्हीच घरी होत्या. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक भारत काकडे, पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी भेट दिली.