⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

प्राणघातक हल्ला करणाऱ्या ७ जणांना ५ वर्षे सश्रम कारावास

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२२ । झाडाच्या फांद्या तोडण्याच्या कारणावरून बाप-लेक आणि पुतण्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी (रा.नगरदेवळा ता.पाचोरा) येथील ७ आरोपींना जळगाव जिल्हा न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि प्रत्येकी सहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

शेख अमीर शेख भाईनिया हे त्यांचा मुलगा अन्सार शेख अमीर आणि पुतण्या अफरोज शेख रहिम हे २७ नोव्हेंबर २०१४ रोजी त्यांच्या शेतात झाडाच्या फांद्या तोडत हाेते. त्या ठिकाणी अब्दुल गनी शेख कमरोद्दीन, अब्दुल रउफ शेख कमराेद्दीन, वसीम शेख गुलाम मोहम्मद, अहमद शेख गुलाम मोहम्मद, जुनेद शेख गुलाम मोहम्मद, मेहबूब शेख सईद आणि गुलाम मोहम्मद अब्दुल हबी (सर्व रा.नगरदेवळा ता. पाचोरा) यांनी शेख अमीर शेख भाईनिया व त्यांचा मुलगा अन्सार आणि पुतण्या अफरोज यांना लाथा, काठ्या व कोयत्यांनी वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली होती. याबाबत पाचोरा पोलिस ठाण्यात शेख अमीर शेख भाईनिया यांच्या फिर्यादीवरून ७ जणांवर गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर ७ संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती. तपास अधिकारी सचिन राऊत हे गुन्ह्यातील तपासाचे काम करत होते. हा खटला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. एम. खडसे यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आला.

११ साक्षीदारांची तपासणी

सरकार पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले. गुरुवारी काेर्टात कामकाज झाले असता दाखल गुन्ह्यातील आरोपींना दोषी ठरवण्यात आले. सातही आरोपींना पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा आणि प्रत्येकी ६ हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास १५ दिवसांची साधी कैद सुनावली. सरकारतर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता नीलेश चौधरी, ॲड. शरीफ यांनी काम पाहिल. पैरवी अधिकारी देविदास कोळींनी मदत केली.