जळगाव जिल्हा

लखनऊ येथे झालेला जागतिक शांतता आणि एकता उत्सवात जळगावच्या ‘किड्स गुरुकुल’चा डंका!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | ७ सप्टेंबर २०२३ | लखनऊ येथे नुकतेच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील १९ व्या जागतिक शांतता आणि एकता उत्सव ‘कॉनफ्लूएंस २०२३’ मध्ये जळगावच्या किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलने डंका वाजवला आहे. उत्सवातील विविध स्पर्धेत सहभागी झालेल्या २० विद्यार्थ्यांच्या संघाने तब्बल ७ स्पर्धेत ८ बक्षिसे पटकावली आहेत. विजयी संघ सर्वोत्कृष्ट विजेतेपदाची ट्रॉफी घेऊन जळगावात पोहचताच त्यांचे शाळा व्यवस्थापन व पालकांतर्फे जंगी स्वागत करण्यात आले.

जगातील सगळयात मोठी शाळा म्हणून नावाजलेली लखनऊ येथील सिटी माँटेसरी स्कूलतर्फे दि.३० ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२३ दरम्यान डब्ल्यूयूसीसी ऑडिटोरियम लखनऊ येथे १९ व्या जागतिक शांतता आणि एकता उत्सव ‘कॉनफ्लूएंस २०२३’ चे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये एकता, शांततेचे बीज रुळावे, त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा, जगभरातील नवीन गोष्टींचे ज्ञान व्हावे तसेच तज्ञांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी दरवर्षी या उत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. देशविदेशातील अनेक आमंत्रित शाळा स्पर्धेत सहभागी होत असतात. जळगावातील किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलने देखील स्पर्धेत सहभाग घेतला होता. शाळेतील २० विद्यार्थ्यांच्या चमूने उत्सवात सहभागी होत विविध स्पर्धेत भाग घेतला.

नेहमी अग्रेसर असलेल्या किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यंदा देखील आपल्या विजयाचा नवा मानबिंदू प्रस्थापित केला. उत्सवात आर्टसी लेन्समध्ये प्रथम, जाहिरात स्ट्रीटमध्ये प्रथम, ब्रेन-ओ-थॉनमध्ये प्रथम आणि तृतीय, नृत्यात द्वितीय, नाटकात द्वितीय, कोलाज मेकिंग मध्ये द्वितीय, पोस्टर मेकिंग स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेचे सर्वोत्कृष्ट विजेते आणि वरिष्ठ गट विजेतेपद देखील किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलच्या संघाने पटकावले. यापूर्वी सुद्धा किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल ने सहभाग घेऊन २०२१-२२ मध्ये २ ट्रॉफी, २०२२-२३ मध्ये ३ ट्रॉफी पटकवून या वर्षी उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे सर्वोच्च स्थान पटकावले.

विजयी संघामध्ये १० वीचे प्रणव जैन, अनुष्का गांधी, तनीश जैन, कार्तिक सैंदाने, दर्शना जैन, ज्ञानेश मानकरे, पार्थ दौलतानी, ९ चे पार्थ झंवर, पलक झंवर, सिध्दांत शिरसाळे, अदिती मुथा, सोहा मेश्री व निशिका आसावा ८ वीचे किमया कावडीया, आरव शाह, जिया मर्चंट, गार्गी मिश्रा, सानिका भंसाली, मोक्ष जैन, व मयुराक्षी शर्मा या विद्यार्थ्याचा समावेश होता. सर्वोत्कृष्ट विजेतेपदाचे पारितोषिक स्वीकारल्यावर संघ व्यवस्थापक आणि विद्यार्थ्यां एकच जल्लोष केला, यावेळी त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते.

विजयी संघाने, शाळेचे अध्यक्ष आदेश ललवाणी, मुख्याध्यापिका मीनल जैन, संचालिका हर्षिता ललवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश संपादन केले. संघाला उपमुख्याध्यापिका ममता खोना, कृती जैन, मिलन साळवी, राखी गौर, हेलेना शेफर्ड, शालीनी मेहता, मोहन गोमासे, रचना महाजन, हर्षदा दुसाने, स्वाती महाजन, दिपक नेवे, योगेश मर्दाने, नरेश रायसिघांनी अशोक नेरकर, भुषण शिंपी, महेंद्र तायडे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. विजयी संघाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. जळगांव शहरात अल्पावधीत किड्स गुरुकुलने एक विशेष ओळख व मानाचे स्थान प्राप्त केले असून उत्तर महाराष्ट्रातील शिक्षणक्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button