बालरंग नाट्यशिबिराचा सांस्कृतिक सादरीकरणाने समारोप
भैय्यासाहेब गंधे सभागृहातील हाऊसफुल्ल रसिकांसमोर ३५ बालकलावंतांनी केले सादरीकरण
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२४ । जळगाव शहरातील बालकलावंतांवर नाट्यसंस्कार होवून, नृत्य, नाट्य व संगीताच्या माध्यमातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास व्हावा म्हणून यंदा उन्हाळी सुट्टीमध्ये बालरंगभूमी परिषद व नाट्यरंग जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बालरंग नाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आज बालरंग महोत्सवाच्या माध्यमातून या शिबिराचा समारोप करण्यात आला.
या शिबिरात विद्यार्थ्यांना नृत्य, नाट्य व संगीत तसेच रंगमंचावरील अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा, वेशभूषा आदी नाट्यांगांचे प्रशिक्षण देण्यात आले होते. या सर्व कलांचा समन्वयातून २ तासांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शहराचे आमदार राजूमामा भोळे, जळगाव पीपल्स को-ऑप बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य पी.आर.चौधरी, ज्येष्ठ रंगकर्मी हेमंत कुलकर्णी, चिंतामण पाटील, नाट्यसमीक्षक राजेंद्र देशमुख आदी उपस्थित होते. सुरुवातीस मान्यवरांसह बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे व नाट्यरंगच्या अध्यक्षा सौ.दिशा ठाकूर यांच्या हस्ते नटराजपूजन करण्यात आले. त्यानंतर प्रास्ताविक बालरंगभूमीचे प्रमुख कार्यवाह विनोद ढगे यांनी केले.
उपस्थितांना संबोधित करताना प्रमुख पाहुणे भालचंद्र पाटील यांनी आजच्या युगात मुलांना मोबाईलकडून कलेकडे वळविण्यासाठी नियमितपणे अशा शिबिरांचे आयोजन बालरंगभूमी परिषदेने करावे. पालकांना मुलांकडून जे अपेक्षित आहे त्याची सुरुवात पालकांना स्वतःपासून करावी ही अपेक्षा व्यक्त केली. आमदार राजूमामा भोळे यांनी नाट्यकलेच्या माध्यमातून मुलांच्या बुध्दांकासोबतच विविध कलांच्या माध्यमातून त्यांना इमोशन कोशंटही वाढण्यास मदत होते. बालपण ही ओली माती असते, तिला लहानपणापासूनच वेगवेगळ्या कलांच्या माध्यमातून आकार मिळाल्यास उद्याचा सुजाण व जबाबदार नागरिक तयार होवू शकतो. या सर्व प्रयत्नांसाठी लागेल ती मदत करण्याची तयारी त्यांनी यावेळेस दर्शविली. यानंतर महाराष्ट्र शासनाच्या बाल राज्य नाट्य स्पर्धेत पारितोषिक प्राप्त करणाऱ्या बालकलावंतांना सन्मानपत्र देवून सन्मानीत करण्यात आले व शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिंनींना सहभाग प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
बालरंग महोत्सवातंर्गत शिबिरात सहभागी झालेल्या शिबिरार्थींनी संस्कृत गीतगायन, गणेश वंदना ‘पहिलं नमन’ यावर नृत्य सादर केले. त्यानंतर अमोल ठाकूल लिखीत दिग्दर्शित मैत्रीची गुफा आणि म्हावरा गावलाय गो या दोन बालनाट्यांचे प्रयोग सादर करण्यात आले. या बालनाट्यातून माार्वी पाटील, मनस्वी पाटील, समाइरा बाविस्कर, संस्कृती वाणी, देव जोशी, चैतन्य रोटे, भार्गवी महाजन, आरुषी महाजन, वीणा निकम, दुर्गेश हिवाळे, अमोघ पवार, रुद्र पाटील, राजवीर पाटील, मयंक ठाकूर, केतकी कोरे, प्रभुदत्त दुसाने, प्रेम काळे, नीलय इंदुरकर, योगेश्वरी कोळी, काव्या खडके, निर्गुणी बारी, अवनी सोनवणे, जान्हवी सोनार, समर्थ हिरवणे, रागिणी सोनवणे, प्रणव जाधव, अथर्व पाटील, श्लोक गवळी, राशी पडलवार, दर्श पाटील, शर्वा जोशी, स्वरा महाजन, वेदा बारी, अथर्व रंधे, कृतिका कोरे या बालकलावंतांनी अभिनय केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कोरे यांनी तर आभार प्रदर्शन योगेश शुक्ल यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालरंगभूमी परिषदेचे पदाधिकारी व नाट्यरंग थिएटर्सच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.