⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

पिक विमा : शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन

जळगाव लाईव्ह न्युज । सुभाष धाडे । शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता पिकाचा विमा काढुन घ्यावा असे आवाहन मुक्ताईनगर कृषी अधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

‘प्रधानमंत्री पिकविमा योजना खरीप हंगाम सन २०२२-२३’ या योजनेतर्गत तालुक्यातील खरीप हंगामातील ज्वारी, बाजरी, सोयाबीन, भुईमुग, तीळ, मुग,उडिद, तुर, कापुस, मका या पिकांसाठी ‘भारतीय कृषी विमा लिमिटेड मुंबई’ यांच्या सहकार्याने सदर योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेत कुळाचे,भाडेपट्ट्याने शेती कसणारे भुमीहीन मजुर सुद्धा पात्र असुन शेती करणाऱ्या प्रत्येकाने आपापल्या पिकाचा विमा काढला पाहीजे. या योजनेत सहभाग ऐच्छिक आहे. मात्र कर्जदार शेतकरी बांधवांना सहभाग होणे अथवा न होणे यासाठी पर्याय आहे. ज्या कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे नसेल त्यांनी ‘अंतिम मुदतीच्या सात दिवसाच्या सहभागी न होणेबाबतचे स्वयंघोषणापत्र द्यावयाचे आहे.’ अन्यथा, जे स्वयंघोषणापत्र देणार नाही त्यांचा सहभाग असल्याचे समजले जाईल.

दरम्यान बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी नजिकच्या बैंक,आपले सरकार सेवा केंद्र,जनसुविधा केंद्रावर अर्ज स्वीकारले जातील.या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२२ पर्यत आहे. याबाबत अधिक माहीती अथवा चौकशीसाठी स्थानिक पातळीवरील कृषी साहाय्यक अथवा कृषी कार्यालयात संपर्क साधावा.शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता त्वरीत आपापल्या पिकाचा विमा काढुन घ्यावा असे आवाहन मुक्ताईनगर कृषी अधिकारी यांच्या वतीने करण्यात येत आहे.