⁠ 
शनिवार, मे 18, 2024

टिकाटिपण्णी, कारवाईचे सॉफ्ट टार्गेट ‘पोलीस’

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । राज्यासह शहरातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची सर्व भिस्त पोलीस प्रशासनावर आहे. राज्याची कायदा व सुव्यवस्था सध्या तोकड्या पोलिसांवर सुरू असून पुरेसे मनुष्यबळ नसतानाही ते आपली जबाबदारी पार पाडत आहे. कुमक वाढविण्यासाठी सरकारची निर्णय घेण्याची बोंब पडत नसली तरी काहीही झाले तर पोलिसांनाच टार्गेट केले जाते. दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करीत ऊन, पाऊस, वारा सहन करून थोडा वेळ स्वतःसाठी काय काढला तर तो सर्वांच्या नजरेत बसतो. कारण कोणतेही असो पहिला बळी पोलिसाचाच जातो.

मुंबईतील वाझे प्रकरण असो की शिरूरमधील पोलिसांकडून मारहाण करण्याचे प्रकरण असो कोणत्याही प्रकरणात पोलिसाचाच बळी जातो. काहीही गडबड झाली तरी तात्काळ पोलिसांवर कारवाई केली जाते. शासकीय व्यवस्थेतील पोलीस असा घटक आहे जो दिवसरात्र राबराब राबतो आणि सहज टार्गेट होतो. अवैद्य धंदे, भ्रष्टाचार, घोटाळे, अपहार, कायदा-सुव्यवस्था यासाठी पोलिसांनाच जबाबदार धरण्यात येते. शासकीय व्यवस्थेतील सर्व धागेदोरे तपासले असता भ्रष्टाचार पोलीस विभागापेक्षा इतर विभागातच भ्रष्टाचार जास्त आहे. पोलीसदलात अधिकारी, कर्मचारी शेकडो हजारांचा झोल करीत असतील तर इतर शासकीय अधिकारी लाखोंचा झोल करतात.

पोलीस नेहमी रस्त्यावर राहणारा, सर्वसामान्यांच्या संपर्कात असलेला, पोलीस ठाण्यातील वादविवाद, दाखल्यांची कामे, पासपोर्ट व्हेरिफिकेशन, सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, सण-उत्सव, मिरवणुकींच्या परवानगीसाठी पोलीस ठाण्यातच काम पडत असल्याने पोलीस सर्वांच्या परिचयाचा होतो. ऊन, पाऊस, वारा, थंडीत दिवस असो की रात्र पोलीस न डगमगता काम करतो. वादळ आले किंवा पूर आला पोलिसच सर्वात पुढे असतात. कार्यालयीन कामे, तपासाचा भाग, बंदोबस्त, वरिष्ठांचे दडपण आणि राजकीय हस्तक्षेप यामुळे पोलीस प्रचंड मानसिक त्रासातून जात असतो. आपल्या दिवसभराच्या गडबडीत परिवाराला आणि स्वतःसाठी द्यायला त्याला वेळच भेटत नाही. सर्व मानसिक त्रासातून तो आणखी खचत जातो आपण व्यसनाधीन होऊन आजारांनी ग्रासला जातो.

जळगाव जिल्हा पोलीस दल सध्या दोन गोष्टींमुळे चर्चेत आहे. पहिली गोष्ट म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आहे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला अवैद्य धंद्यांचा मुद्दा उपस्थित करीत चांगलेच खडसावले तर दुसरी बाब म्हणजे एका सेवानिवृत्त पोलिसाच्या पार्टीत भुसावळचे नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्यासोबत नृत्य केल्याने ५ पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. सोशल मीडियात याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत असल्या तरी पोलिसांच्या व्यक्तिस्वातंत्र्याबद्दल काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांमध्ये कुठल्या राजकारण्याचे लागेबंधे आहेत आणि कुणाच्या आशीर्वादाने ते अवैध धंदे सुरू आहेत हे सर्वांना परिचित आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये राष्ट्रवादीच्या एका बड्या पदाधिकाऱ्याला दोन वेळा पोलिसांनी अवैध धंद्याप्रकरणी अटक केली. नेमके याच अटकेनंतर उपमुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना खडसावले.

अवैद्य धंदे कितपत सुरू ठेवावे यावरही राजकारण्यांचा अंकुश असतो. अवैध धंदे पूर्णपणे बंद केले तर राजकारणी तिकडूनही ओरडतात. ‘साहेब, आमचे कार्यकर्ते आहेत जरा त्यांचा विचार करा. बिचारे काय खाणार? काय करणार? बेरोजगारी वाढली आहे’ अशी ना-ना कारणे राजकारणी देत असतात. अवैध धंदे सुरू असले तरी ‘साहेब, अवैध धंदे फार वाढलेत, नागरिकांची ओरड होते आहे, लक्ष द्या, सर्व बंद व्हायला हवे’ अशी सूचना ही राजकारणीच करतात. पोलीस अधिकाऱ्यांपुढे करावे तरी काय? प्रश्न उपस्थित होतो. जिल्ह्यातील बहुतांश पुढारी कमी-अधिक प्रमाणात अवैध धंद्यांशी निगडितच आहेत. सट्टा-पत्ता-मटका याचा फारसा संबंध नसला तरी अवैध वाळू वाहतुकीशी त्यांचा संबंध आहे. स्वतः बरबटलेले असलेले हे राजकारणी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी पोलिसांच्या कार्यशैलीवर बोट ठेवतात आणि जेव्हा काही स्वतःच्या अंगलट येते तेव्हा पोलिसांच्याच विनवण्या करतात.

सहाय्यक फौजदाराने सेवानिवृत्ती निमित्त आयोजित केलेल्या एका पार्टीत भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्यासोबत डांस केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पाच पोलिसांवर कारवाई करण्यात आली. पोलीस अधिक्षकांनी योग्य भुमिका घेत कठोर कारवाई केली नसली तरी पोलिसांची प्रतिमा मात्र मलीन झाली आहे. पोलीस अधिक्षकांनी योग्य भुमिका घेत कर्मचारी पण जपले आणि इतरांच्या तोंडाला देखील लगाम लावला आहे. एका खाजगी आवारात आयोजित केलेल्या या पार्टीत सहभागी झालेले पोलीस कर्मचारी हे आपले कर्तव्य सोडून त्याठिकाणी उपस्थित नव्हते.

आपल्या हद्दीत कुठेही काहीही अघटित झाले असते तर त्यांना धाव घ्यावीच लागली असती. अनिल चौधरी यांच्यावर गुन्हे दाखल असल्याने त्यांच्यासोबत नाचणे ही चूक असेल तर ज्या-ज्या राजकारण्यांवर गुन्हे दाखल आहेत त्यांच्यासोबत एका व्यासपीठावर बसणे देखील गुन्हाच आहे. पोलिसांबद्दल जनमानसात सहानुभूती असली तरी व्हायरल व्हिडीओपासून बचावाची भुमिका घेणे पोलिसांनी क्रमप्राप्त आहे. गेल्या काही वर्षात पोलिसांचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मिडियात व्हायरल झाले आणि त्यांना कारवाईला सामोरे जावे लागले. पोलीस हा समाजातील एक महत्वाचा घटक असून त्याला एक वेगळी प्रतिष्ठा आहे. पोलिसांनी कुठेही वावरताना आपल्याकडे इतरांच्या नजरा आणि मोबाईल कॅमेरे लक्ष ठेवून असतात याची त्यांनी जाणीव ठेवणे आवश्यक आहे.