जळगाव लाईव्ह न्यूज । अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याच्या स्नुषा मधुरीमा राजे छत्रपती यांनी विधानसभेच्या रिंगणातून माघार घेतल्यानंतर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी खालच्या पातळीवर टीका केली होती. .”दम नव्हता, झक मारलीस” असा शब्दात सतेज पाटील यांनी मधुरीमा राजे यांना उद्देशून आपला संताप व्यक्त केला. याचा व्हिडीओ संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस व महाविकास आघाडीवर जोरदार टीका होवू लागली आहे. छत्रपतींच्या कुटुंबीयांचा अवमान करणे ही काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची परंपराच बनली आहे. त्या परंपरेची पुनरावृत्ती काँग्रेसचे नेते आणि आमदार सतेज पाटील यांनी केली असून सतेज पाटील यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशीच भावना उभ्या महाराष्ट्रातून व्यक्त केली जात आहे.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसने छत्रपती घराण्याच्या स्नुषा, खासदार शाहू महाराज यांचे पुत्र मालोजी राजे यांच्या पत्नी मधुरिमा राजे यांना उमेदवारी जाहीर केली होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार यांनी अर्ज मागे घेतला नाही आणि त्यामुळे मधुरिमा राजे छत्रपती यांनी काँग्रेसची अधिकृत उमेदवारी मागे घेतली. कोल्हापूर उत्तरची जागा काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. मधुरिमा राजे यांनी आपली उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर सतेज पाटील यांनी अत्यंत खालच्या शब्दात छत्रपतींच्या घराण्यातील सुनेवर टीका केल्याचा व्हिडीओ कॅमेरात कैद झाला.”दम नव्हता, झक मारलीस” असा शब्दात सतेज पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला. हे अपशब्द फक्त एका काँग्रेस उमेदवाराच्या विरोधातील नसून शिवछत्रपतींच्या घराण्यातील सुनेच्या विरोधात आहेत, अशी भावना संपूर्ण महाराष्ट्रातून व्यक्त होत आहे.
महाराष्ट्राची आणि शिवरायांच्या घराण्याची बिनशर्त माफी मागावी
विशाळगडावर प्रचंड अतिक्रमण झाले. शिवप्रेमी संघटनांनी या अतिक्रमणाच्या विरोधात आवाज उठवत प्रशासनाला या अतिक्रमणाच्या विरोधात कारवाई करण्यास भाग पाडले. तेव्हा या अतिक्रमण करणाऱ्यांच्या बाजूने गडावर जाणाऱ्यात सतेज पाटील यांचा समावेश होता. आज छत्रपती घराण्यातील सुनेच्या विरोधात वाईट शब्दात टीका करणाऱ्या सतेज पाटलांची हिम्मत विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विरोधात का उफाळून आली नाही, असा प्रश्न देखील आता विचारला जात आहे. शिवरायांच्या घराण्यातील सुनेच्या विरोधात हीन भाषेत टीका करणारे सतेज पाटील आणि त्यांच्या काँग्रेसचा माज उतरवल्याशिवाय महाराष्ट्रातील जनता स्वस्थ बसणार नाही. त्यांनी त्यांच्या कृत्याबद्दल महाराष्ट्राची आणि शिवरायांच्या घराण्याची बिनशर्त माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्रातून होत आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वारंवार अपमान
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दोन गाद्या महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत. थोरली गादी साताऱ्याला असून खासदार उदयन राजे त्याचे प्रतिनिधित्व करतात तर धाकटी गादी कोल्हापूरला असून काँग्रेसचे खासदार शाहू महाराज त्या गादीचे प्रतिनिधी आहेत. मात्र या दोन्ही गाद्यांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वारंवार अपमान केला आहे. गंभीर बाब म्हणजे यात शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्या पाठोपाठ आता सतेज पाटील यांची भर पडली आहे.
शरद पवार आणि युवराज संभाजी राजे
कोल्हापूरच्या गादीचे प्रतिनिधी श्रीमंत शाहू महाराज यांचे ज्येष्ठ सुपुत्र युवराज संभाजी राजे छत्रपती यांना राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभा खासदारकी मिळाली. त्यावेळी शरद पवार यांनी “आतापर्यंत राजे पेशव्यांची नियुक्ती करीत होते आता पेशवे छत्रपतींना नियुक्त करू लागले” अशी टीका करत अपमान केला होता.
संजय राउत आणि उदयन राजे
छत्रपती उदयन राजे भोसले यांच्याशी वाद झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांची कागदपत्रे तपासली पाहिजेत अशी अत्यंत हीन दर्जाची टीका उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केली होती. यावर मोठे राजकीय वादळ उठले होते. राऊत यांच्यावर चहुबाजूने जोरदार टीका झाल्यानंतर त्यांनी सावरासावर करण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने भाजप वगळता अन्य कुठल्याही पक्षाच्या प्रतिनिधींनी संजय राऊत यांच्या त्या कृतीचा कधीही निषेध केला नाही.
उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे
2022 च्या जून महिन्यात महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुका लागल्या. कोणत्याही आघाडीकडे अधिकचा उमेदवार निवडून आणण्याची क्षमता नव्हती. तेव्हा संभाजी राजे छत्रपती यांनी सर्वांनी आपल्याला बिनशर्त पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले होते. मात्र संभाजीराजे छत्रपती यांनी मातोश्रीवर येऊन शिवबंधन बांधावे अशी अट उद्धव ठाकरे यांच्याकडून घालण्यात आली. छत्रपती शिवरायांची गादी चालवणाऱ्या संभाजीराजे छत्रपती यांना हा अपमान सहन झाला नाही आणि त्यांनी शिवबंधन बांधायचे नाकारले.