जळगाव लाईव्ह न्यूज | ३१ जानेवारी २०२३ | स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी असल्याचे भासवून दोन चोरट्यांनी सेवानिवृत्त बीडिओ वसंत किसन साळूंखे यांची सोन्याची चेन व अंगठी लंपास केल्याची घटना सोमवारी दुपारी ४ वाजता आयएमआर महाविद्यालयाजवळ घडली. याप्रकरणी सायंकाळी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सेवानिवृत्त बीडिओ वसंत साळूंखे हे गणेश कॉलनीमध्ये वास्तव्यास आहेत. दुचाकीची बॅटरी चार्जिंग करण्यासाठी सोमवारी दुपारी चार वाजता ते आयएमआर महाविद्यालयाजवळील बॅटरी रिचार्ज सेंटरवर आले होते. सेंटर चालकाच्या ताब्यात दुचाकी दिल्यानंतर ते काही अंतरापर्यंत पायी चालत गेले. त्याचवेळी त्यांना एकाने रस्त्यात अडवून मी पोलिस असून स्थानिक गुन्हे शाखेचा कर्मचारी आहे.
खुप चो-या होत असून तुम्ही तुमचे दागिने निष्काळजीपणे घालून कसे फिरता आहेत, असा म्हणाला. तेवढ्यात त्या व्यक्तीचा साथीदार हा तेथे दुचाकीवरून आला. त्या दोघांनी जवळच उभ्या असलेल्या एका व्यक्तीकडील दागिने रुमालमध्ये ठेवून वसंत साळूंखे यांच्याकडे येवून तुम्हीही तुमच्याकडील अंगठी व चेन आमच्याकडे द्या, असे दोघे म्हणू लागले.
दोघे पोलिसच असल्याची खात्री वाटू लागल्यामुळे साळूंखे यांनी सुध्दा त्यांच्याजवळील अंगठी व चेन काढून त्या व्यक्तींच्या हातातील रूमालमध्ये ठेवली. नंतर त्या दोघांनी रूमाल गुंडाळून साळूंखे यांना देवून तेथून धूम ठोकली. काही मिनिटांनी साळूंखे यांनी रूमाल उघडून पाहिल्यानंतर त्यात दगड मिळून आल्यावर आपली फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात आला. सायंकाळी त्यांनी लागलीच जिल्हापेठ पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.