जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२५ । गेल्या वर्षीच्या हंगामात कापसाला योग्य दर न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. यामुळे यंदा अनेक ठिकाणी कापूस लागवडीत घट दिसून आलीय. यंदाच्या हंगामातील कापसाला काय भाव मिळणार? याकडे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर अनेक ठिकाणी कापूस खरेदीस प्रारंभ झाला. जळगावमधील धरणगावात पहिल्याच दिवशी कापसाला ७६५३ तर करमाड, ता. पारोळा येथे ७४०० रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला.

धरणगावात श्रीजी जिनिंग येथे काटा पूजन खासदार स्मिता वाघ, दिलीप पाटील, बाळासाहेब चौधरी, जि.प.चे माजी सभापती पी.सी. पाटील, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, जि.प.चे माजी सदस्य प्रताप पाटील, पोलिस निरीक्षक सुनील पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

रत्नापिंप्री करमाड खुर्द, ता. पारोळा येथे बाजार समिती संचालक जिभाऊ पाटील यांनी काटा पूजन केले. शेतकरी प्रवीण जुलाल पाटील, अशोक मल्हारी पाटील व रमेश भगवान पाटील या शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात आला. त्याला ७४०० रुपयांचा भाव मिळाला.











