जळगाव लाईव्ह न्यूज । १२ डिसेंबर २०२३ । यावर्षी पावसाचा खंड, गुलाबी बाेंडअळीसह अन्य किडी व राेगांचा प्रादुर्भाव, परतीचा व अवकाळी पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे कापसाचे उत्पादन घटले आहे. त्यातच कापसाचे दर हमीभावापेक्षाही कमी झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. जिल्ह्यातील अनेक जिनिंगवर ६६०० ते ७२०० रुपयांपर्यंत दर दिले जात आहेत. मात्र, ७२०० पर्यंतचा दर देखील चांगल्याच मालाला दिला जात आहे. त्यामुळे आता तरी जिल्ह्यात सीसीआयचे केंद्र सुरू व्हावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
जळगाव जिल्ह्यात सध्यस्थितीत शेंदुर्णी, पाचोरा, बोदवड या तीनच ठिकाणी सीसीआयचे केंद्र सुरू आहेत. अन्य ठिकाणी मात्र कापसाची खरेदी व्यापाऱ्यांकडून किंवा जिनर्सकडूनच होत आहे. मात्र, त्याठिकाणीही कमी भाव मिळत आहे. शेतकऱ्यांकडून भाव वाढीच्या अपेक्षेने आपला माल विक्रीसाठी आणला जात नसल्याने, जिल्ह्यातील कापूस उद्योगात मंदीचे चित्र आहे. सध्या तरी भाव वाढीचे कोणतेही संकेत दिसून येत नाहीत.
जिल्ह्यातील शेंदुर्णी, पाचोरा व बोदवड याठिकाणी कापसाची सीसीआयकडून खरेदी सुरू आहे. तीन ठिकाणी शासकीय खरेदी सुरू तर इतर ठिकाणी सुरू करण्यास अडचण काय, असा प्रश्न निर्माण केला जात आहे. दरम्यान, जळगाव तालुक्यात सीसीआयकडून बाजार समिती प्रशासनाने शेकडा १ रुपये ५ पैसे एवढा करवसुलीच्या सूचना दिल्या आहेत. तर सीसीआय मात्र ५५ पैसे देण्याबाबत तयार आहे. सीसीआय व बाजार समिती प्रशासनाच्या कराच्या वादामुळे सीसीआयचे केंद्र जळगाव तालुक्यात सुरू होऊ शकलेले नाही.
दरम्यान, सीसीआयच्या केंद्रावर कापला हमीभाव तरी मिळतो. त्यामुळे सीसीआय केंद्र सुरु झाले तर हमीभाव इतका तरी भाव मिळेल मात्र शासकीय खरेदी सुरु झाली नाही तर शेतकऱ्यांना तेवढा भाव देखील मिळणार नाही.