साठवण तलावाच्या कामात पावणे दोन कोटी रुपयाचा भ्रष्टाचार
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२१ । नगरपालिके द्वारा शहरास पाणीपुरवठा करणारा अतिरिक्त साठवण तलाव बांधण्यात आला त्यात कंत्राटदारांनी व अधिकाऱ्यांनी सुमारे पावणे दोन कोटी रुपयाचा भ्रष्टाचार करण्यात आला असल्याचा आरोप खुद नगराध्यक्षा नौशाद तडवी यांचेसह पाच नगरसेवकांनी जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित राऊत यांचेकडे सोमवारी निवेदनाद्वारे केला आहे. दोषीवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही निवेदनात केली आहे. नगरपालिकेच्या कामाच्या भ्रष्टाचाराची तक्रार खुद नगराध्यक्षांनी केल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
शहरास पाणी पुरवठा करण्यासाठी पूर्वीच्या साठवण तलावा लगतच नगरपालिकेने सुमारे दोन कोटी 84 लाख रुपयाचा अतिरिक्त साठवण तलाव बांधला आहे या कामात संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांनी सुमारे 1 कोटी 80 लाख रुपयाचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप येथील नगराध्यक्ष तडवी यांनी सोमवारी जिल्हाधिकारी यांचेकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केला आहे निवेदनात नियोजनबाह्य निविदा काढणे, साठवण तलावाची जागा न मोजता घाईघाईने कामास सुरुवात करणे, अंदाजपत्रकानुसार तसेच आराखड्यानुसार तलावाचे काम न करणे, कामात झालेल्या बदलाची वरीष्ठाकडून मंजुरी घ्यावी अशा सूचना असतानाही तलावाचा आराखडा कमी करून मोठ्या रकमेचा अपहार करणे सोयीचे जावे हे नियोजन बद्ध करण्यात पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी, अभियंता, कंत्राटदार तसेच काही नगरसेवक यांचा समावेश असल्याची ही तक्रारीत नमूद आहे.
निवेदनात मुख्याधिकारी, अभियंता, कंत्राटदार त्यांच्या जवाबदारीची व तलावाच्या कामाच्या प्रतवारीची चौकशी करून त्यांचेवर कडक कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर नगराध्यक्ष नौशाद तडवी, नगरसेवक मनोहर सोनवणे, रजीयाबी गुलाम रसूल, सै. युनुस सै. युसुफ, शे. सईदाबी हारुन , शमशाद बेगम यांच्या सह्या आहेत.