जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२२ । एकीकडे राज्यातील भाजपनेते कोरोना (Corona ) काळात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आहे. तर आता दुसरीकडे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे (Ekanth Khadse) यांनी जळगाव जिल्ह्यात कोरोना काळात औषधी व रूग्णालय साहित्य खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. तसेच याबाबत शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांनी देखील चौकशीची मागणी केल्याचे खडसे यांनी सांगितले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
पुढे बोलताना खडसे म्हणाले की, या गैरव्यवहाराप्रकरणी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे देखील तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र पाठपुरावा न झाल्याने अखेर दिनेश भोळे व माधुरी अत्तरदे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेऊन कारवाईची मागणी केली होती.
यासंदर्भात सत्र न्यायाधीशांनी पालकमंत्री व राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हा शल्यचिकित्सक व अन्य अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली आहे. दरम्यान खडसेंच्या खुलाशानंतर राज्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.