जळगाव लाईव्ह न्यूज : भुसावळ प्रतिनिधी । भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडून आल्यानंतरही राजीनामा न देता राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या दहा नगरसेवकांना जळगाव जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांनी सोमवार, 18 जुलै 20 रोजी एका टर्मसाठी (पाच वर्ष) अपात्र ठरवले होते. अपात्र नगरसेवकांतर्फे या निर्णयाविरोधात नगरविकास विभागाकडे याचिका दाखल करण्यात आली होती मात्र मंगळवार, 18 रोजी ही याचिकादेखील फेटाळण्यात आल्याने या नगरसेवकांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह त्यांच्या गटासाठी ही बाब प्रचंड धक्कादायक मानली जात आहे. या गटाला आता खंडपीठात याचिका दाखल करण्याचा केवळ पर्याय आहे. लागले आहे.
असे आहे नेमके प्रकरण
भुसावळ नगरपालिकेच्या 2016 च्या सार्वत्रिक निवडणूकीत भाजपच्या कमळ चिन्हावर लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, तत्कालीन नगरसेवक अमोल इंगळे (प्रभाग 1 ब), लक्ष्मी रमेश मकासरे (प्रभाग 1 अ), सविता रमेश मकासरे (प्रभाग 2 अ), प्रमोद पुरुषोत्तम नेमाडे (प्रभाग 6 ब), मेघा देवेंद्र वाणी (10 अ), अॅड.बोधराज दगडू चौधरी (9 ब), शोभा अरुण नेमाडे (20 अ), किरण भागवत कोलते (22 ब) व शैलजा पुरुषोत्तम नारखेडे (प्रभाग 19 अ) हे निवडून आले मात्र त्यांनी 29 डिसेंबर रोजी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच 17 डिसेंबरला तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. भाजपातून बाहेर पडताना राजीनामा न दिल्याने भाजपाच्या नगरसेविका पुष्पा बत्रा यांनी जिल्हाधिकार्यांकडे 29 डिसेंबर रोजी याचिका दाखल झाल्यानंतर त्यांना जिल्हाधिकार्यांनी अपात्र ठरवले होते.
खंडपीठात दाद मागणार : एकनाथराव खडसे
नगरविकास विभागाच्या निर्णयाविरोधात खंडपीठात दाद मागण्यात येईल, असे माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले. हा निर्णय सरकारकडून अपेक्षितच होता, त्यामुळे आधीच आम्ही अपिल केले होते, असेही ते म्हणाले.