जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२२ । शहरापासून जवळच असलेल्या शिरसोली गावात एका तरुणाने सोशल मीडियावर ठेवलेल्या स्टेटसवरून दोन गटात वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत आणि नंतर दगडफेक झाल्याने गावात तणाव निर्माण झाला होता. एमआयडीसी पोलिसांनी वेळीच धाव घेत हस्तक्षेप केल्याने पुढील वाद टाळला. दरम्यान, दगडफेकीत काही वाहनांचे नुकसान झाले असून एक तरुण जखमी झाला आहे.
दगडफेकीत रहीस युसुफ मणियार यांच्या मालकीची एमएच.१९.सीवाय.२७९९ आयशर ट्रक व डॉ.सुफीयान शाहा यांच्या मालकीची चारचाकी क्रमांक एमएच.०३.एआर.१५०८ च्या काचा फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर अहमद अखिल पिंजारी वय-१८ हा तरुण रस्त्याने मलीक नगरमध्ये जात असताना डोक्याला दगड लागल्याने जखमी झाला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गावात वादात आधी आक्षेपार्ह व्हाट्सअप स्टेटस ठेवणाऱ्या तरुणाला मराठी शाळेच्या मोकळ्या मैदानात काही तरुणांनी मारहाण केली, यात काही तरुणांनी मध्यस्थी करुन वाद मिटवला. वाद शांत झाल्यावर अफवा पसरवून काही तरुणांनी मलीकनगर व नशेमन कॉलनीत काही समाजकंटकांनी दगडफेक केली. मात्र शिरसोली गावात हनुमान जंयती निमित्त पोलीस बंदोबस्त असल्याने एमआयडीसी पोलीस लागलीच घटनास्थळी पोहोचले यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.
घटनास्थळी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे व त्यांचे सहकारी पोहचले असून परिस्थिती नियंत्रणात आहे. दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास व गुन्हा दाखल करण्याचे काम एमआयडीसी पोलीस करीत आहे.