जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑगस्ट २०२५ । येत्या दिवाळीनंतर मागच्या काही वर्षांपासून रखडल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे. याच पार्श्वभूमीवर सगळ्या पक्षांने कंबर कसायला सुरुवात केली असून मात्र यातच पक्षांतराचेही वारे वाहू लागले आहे.

महाविकास आघाडीतील अनेक नेते सत्तेत असलेल्या महायुतीच्या घटक पक्षांमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. अशातच जळगावात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याआधीच काँग्रेसला आनखी एक मोठा धक्का बसला आहे. प्रतिभा शिंदे यांनी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून त्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. तर दुसरीकडे जिल्हा कार्यकारिणीवरील एका पदाधिकाऱ्याने देशील काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. गेल्या ४५ वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या त्या पदाधिकाऱ्याने राजीनामा दिल्याने काँग्रेससाठी तो आणखी मोठा दुसरा धक्का मानला जात आहे.

उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचा एक मोठा चेहरा आणि लोक संघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यामुळे स्थानिक राजकारण माहिती असलेला एक मोठा चेहरा काँग्रेसनं गमवल्याची चर्चा सुरू झाली आहे. येत्या 17 ऑगस्ट रोजी जळगावमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रतिभा शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.
दरम्यान, शिंदे यांनी आपल्या राजीनाम्याची कारणी मिमांसा करताना काँग्रेसमधील राज्याच्या धुरिणांवर जोरदार टीका केली आहे. दोन वर्षांपासून मी काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ज्या आशा घेऊन मी गेले होते आणि जे प्रश्न सोडविण्याची मला अपेक्षा होती, त्या संदर्भात मला तितकासा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. शिवाय, काँग्रेसमधून बाहेर पडण्यास जे कोणी प्रदेश पदाधिकारी कारणीभूत ठरले, त्यांची थेट नावे त्यांनी घेतली आहेत.
शिंदे यांच्यानंतर जळगाव जिल्हा काँग्रेसचे रावेर लोकसभा मतदारसंघातील कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेचे (इंटक) विभागीय अध्यक्ष भगतसिंग पाटील यांनीही राजीनाम्याचे पाऊल आता उचलले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे कार्याध्यक्षपदाचा तसेच इंटकचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्याकडे विभागीय अध्यक्षपदाचा राजीनामा त्यांनी पाठवून दिला आहे. विशेष म्हणजे जळगाव जिल्हाध्यक्षांच्या कार्यपद्धतीला आणि निष्क्रियतेला कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचेही त्यांनी राजीनाम्यात स्पष्टपणे नमूद केले आहे.दरम्यान भगतसिंग पाटील हे यांनतर कोणत्या पक्षात प्रवेश करतात याबाबत अद्यापही कळू शकले नसले तरी ते अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे जळगावात अजितदादांची ताकद वाढणार असल्याची चर्चा सुरूय.








