रविवार, डिसेंबर 10, 2023

विद्यापीठातील गैरप्रकारा विरोधात काँग्रेस, शिवसेनेने विद्यापीठ प्रशासनाला धरले धारेवर

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२३ । एकीकडे विद्यार्थ्याकडून परीक्षांचे आगावू शुल्क जमा करायचे व दुसरीकडे विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये मात्र जुन्याच प्रश्नपत्रिका नवीन करून द्यायच्या असा प्रकार कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशासनाने केला आहे, असा आरोप करीत सिनेट सदस्यांसह युवक काँग्रेस, युवा सेनाने प्रशासनाला हार देऊन सत्कार करीत परीक्षा विभागातील गैरकृत्याचा निषेध केला.

तसेच प्रश्नपत्रिकांचे पताके भेट देत “येथे जुन्याच प्रश्नपत्रिका नव्या करून दिल्या जातात” असे बॅनर झळकावले. तसेच, शनिवारी १० रोजी कुलसचिव विनोद पाटील यांना धारेवर धरले. हेतुपुरस्कार केलेला हा प्रकार असून विद्यापीठ प्रशासन नेमके कुणाला का पाठीशी घालत आहे ? असा सवालही त्यांनी केला. विद्यापीठाच्या प्रगतीत दिवसेंदिवस घसरण होत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाअंतर्गत ‘एमबीए’ परीक्षेचे आतापर्यंत पाच विषयांचे पेपर पार पडले. या परीक्षेत विद्यापीठाचा भोंगळ कारभार दिसून आला आहे. परीक्षा विभागाकडून विद्याथ्यांना पाच महिन्यांपूर्वी झालेल्या मागच्या सत्रातील जुन्याच प्रश्नपत्रिका नवीन करून यंदाच्या या सत्राच्या परीक्षेत देण्यात आल्या. त्यादेखील एक-दोन नव्हे, तर तब्बल पाच विषयांच्या परीक्षेत हा प्रकार झाल्याचा आरोपही संघटनांनी केला आहे.

सिनेट सदस्य विष्णू भंगाळे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, युवासेना जिल्हा अधिकारी पियुष गांधी,अमित जगताप यांनी विद्यापीठात येऊन कुलसचिव विनोद पाटील यांची भेट घेतली. त्यांनी प्रश्नपत्रिकेच्या मुद्द्यावर धारेवर धरून प्रश्नांची सरबत्ती केली. प्रसंगी अधिकाऱ्यांना सकारात्मक उत्तर देता आले नाही. विद्यापीठ प्रशासनाने संबंधित परीक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांची तत्काळ चौकशी करून, त्यांचा राजीनामा घ्यावा व परीक्षा विभागाला पूर्ण वेळ, तसेच तज्ज्ञ असा परीक्षा नियंत्रक नेमावा अशी मागणीदेखील या वेळी करण्यात आली.