जळगाव लाईव्ह न्यूज । २५ नोव्हेंबर २०२४ । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला २०० पेक्षा जागांवर विजय मिळाला असून महाविकास आघाडीला ५० जागांवरही मजल मारता आली नाहीय. यात राज्यात फक्त १६ जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत. यामुळे काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढावली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानतंर आता नाना पटोलेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. यामुळे सध्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झाले आहे. सध्या महायुतीच्या गोटात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर आता नाना पटोले हे दिल्लीला रवाना झाले होते.
त्यांनी २४ नोव्हेंबरला काँग्रेसच्या हायकमांडची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या भेटीत नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी हायकमांडकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. मात्र अद्याप नाना पटोले यांचा राजीनामा काँग्रेसच्या हायकमांडने स्वीकारलेला नाही. त्यामुळे नाना पटोले हे वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत.
नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी अनेक चांगली कामे केली होती. त्यानंतर त्यांच्यावर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली होती. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत नाना पटोले यांना घवघवीत यश मिळाले होते. मात्र, त्यानंतर विधानसभेत त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही.