जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२५ । आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्यातील सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. काँग्रेसनेही या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केलीय. मात्र त्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

तो म्हणजे प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी काँग्रेसची साथ सोडली. त्यांनी आज सोमवारी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. आज शिंदे यांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्षाकडे सुपूर्द केला आहे. दरम्यान यांनतर त्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आलीय.

खरंतर तापी-नर्मदा नद्यांच्या खोऱ्यात तसेच सातपुडा पर्वतरांगांमध्ये वास्तव्यास असलेल्या आदिवासी, दलित, बहुजन आणि अल्पसंख्यांकांच्या न्याय हक्कांसाठी गेली २५ वर्षे लोकसंघर्ष मोर्चाच्या माध्यमातून प्रतिभा शिंदे लढा देत आहेत. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात तसेच शेतकरी आणि आदिवासींच्या प्रलंबित मागण्यांसाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी अनेक वेळा जळगावमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलने सुद्धा केली.
दरम्यान, आदिवासींसह इतर वंचितांचे प्रश्न सोडविण्यासाठी दोन वर्षांपूर्वी प्रतिभा शिंदे यांनी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्यातील नेतृत्व गूण लक्षात घेऊन काँग्रेसने नंतर त्यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सुद्धा सोपवली होती. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने नवीन प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली यावेळी दुसऱ्यांदा पक्षाने प्रतिभा शिंदे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली. प्रदेश कार्यकारिणीवर संधी मिळून आठ दिवस उलटत नाही तितक्यात शिंदे यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांकडे आपल्या पदाचा राजीनामा पाठवून दिला. राजीनाम्याचे नेमके कारण त्यांनी पत्रात नमूद केलेले नाही. मात्र, मंगळवारी जळगावमध्ये आपल्या पुढील वाटचालीविषयीची भूमिका त्या पत्रकारांसमोर जाहीर करणार आहेत.
दरम्यान प्रतिभा शिंदे अजित पवार गटाच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्या १७ तारखेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. . अजित पवारांच्या उपस्थितीत प्रतिभा शिंदे यांचा जळगाव येथे हा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती आहे.








