⁠ 
रविवार, जुलै 14, 2024

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी स्पर्धा आयोजित ; कुठे आणि कशी नोंदणी करावी?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२३ । सांस्कृतिक कार्य विभागा मार्फत राज्यातील ‘उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार २०२३ ‘ स्पर्धा आयोजीत करण्यात आलेली आहे.

सविस्तर माहिती व अर्जाचा नमुना www.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर अर्ज व सहभागासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळांनी आपले अर्ज mahaotsav.plda@gmail.com या ई-मेलवर ५ सप्टेंबर, २०२३ पूर्वी पाठवावेत. जिल्हा स्तरावर जिल्हास्तरीय निवड समिती सहभागी गणेशोत्सव मंडळांचे उत्सवस्थळी प्रत्यक्ष भेट देवून व्हिडीओ व आवश्यक कागदपत्र प्राप्त करुन घेईल.

तसेच प्रत्येक गणेशोत्सव मंडळास पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपुरक सजावट, ध्वनीप्रदुषण विरहित वातावरण, पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रध्दा निर्मुलन, सामाजिक सलोखा, समाज प्रबोधन विषयावरील देखावा/सजावट, स्वातंत्रय चळवळी संदर्भात देखावा, रक्तदान, वैद्यकीय सेवा, विद्यार्थी, महिला व वंचित घटक यांचेसाठी केलेले कार्य, सांस्कृतिक व पारंपरिक खेळाच्या स्पर्धा, गणेशभक्तांसाठी प्राथमिक सुविधा व आयोजनातील शिस्त आदी बाबींवर गुणांकन करुन एक उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची शिफारस राज्यस्तरीय समितीकडे करण्यात येईल.

स्पर्धेतील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास प्रथम क्रमांक – रक्कम रुपये ५ लाख आणि प्रमाणपत्र, व्दितीय क्रमांक – रक्कम रूपये २ लाख ५० हजार आणि प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक – रक्कम रूपये १ लाख आणि प्रमाणपत्र तसेच प्रत्येक जिल्हयातील प्रथम क्रमांकाच्या गणेशोत्सव मंडळास २५ हजार रूपयांचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे.

या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी सहभाग नोंदवावा. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.