जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२१ । जिल्हाधिकारी कार्यालयातील टंचाई शाखेत टंकलेखक, लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या ३२ वर्षीय युवकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना एरंडोल तालुक्यातील जवखेडे खुर्द येथे उघडकीस आली आहे. जितेंद्र हेमराज पवार (रा.कांचननगर, जळगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे कि, रविवारी सायंकाळी मृत जितेंद्र पवार हा जवखेडे खुर्द येथे चुलत भाऊ पंडित पवार यांच्याकडे मुक्कामी आला होता. सोमवारी सकाळी घरात न दिसल्याने पंडित यांनी जितेंद्रच्या पत्नीला जळगावात फोन करून विचारणा केली. मात्र, फिरण्यासाठी गेला असेल म्हणून दुर्लक्ष केले. दुपारी नरेंद्र पाटील यांच्या विहिरीत जितेंद्रचा मृतदेह आढळून आला. ग्रामीण रुग्णालयात डॉ. कैलास पाटील यांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आला. जवखेडा खुर्द येथे अंत्यसंस्कार झाले. जितेंद्रच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.