बकरी ईद साजरी करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक सुचना जाहीर
जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ जुलै २०२१ । कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी धोका अद्यापही कायम असल्याने यावर्षी २१ जुलै, २०२१ रोजी बकरी ईद (चंद्र दर्शनावर अवलंबुन) असून ती अत्यंत साधेपणाने साजरी करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सर्वानी मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन उत्सव साजरा करणे उचित होणार नाही असे शासनाने कळविले आहे.
कोविड-१९ मुळे उध्दभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी बकरी ईद उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याकरीता जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मार्गदर्शक सूचना जाहिर केल्या आहेत.
कोविड-१९ मुळे उध्दभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी. सध्या कार्यान्वीत असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील, नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दुरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावी. नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी. लागू करण्यात आलेले Level of Restrictions for Breaking the Chain दि. ४ जून, २०२१ आणि त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांनुसार इतर निर्बंध कायम राहतील, त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही.
बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये, कोविड-१९ च्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत शासनस्तरावरुन आणखी काही मार्गदर्शक सूचना प्रसिध्द झाल्यास त्याचे देखील अनुपालन करावे. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.