जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जानेवारी २०२६ । जळगावच्या तापमानात चढ-उतार सुरु असून आठवड्याच्या सलग दुसऱ्या दिवशी किमान तापमानाचा पारा घसरला आहे. रविवारी १५ अंशावर असलेला पारा मंगळवारी १० अंशापर्यंत घसरला आहे. गेल्या दोन दिवसात तापमानात ५ अंशाहुन अधिकची घट झाली. दरम्यान,तापमानात घसरन झाल्याने थंडीचा कडाका पुन्हा वाढला असून आता ७ ते १० जानेवारी २०२६ या कालावधीत पहाटे दाट धुके राहण्याची शक्यता आहे.

राज्यासह जळगाव जिल्ह्यातील वातावरणात सतत बदल होताना पाहायला मिळत आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जळगावचा पारा ९ अंशच्या घरात होता. मात्र ४ जानेवारी रोजी जळगावचा पारा एकाच दिवशी ५ अंशाहून अधिकने वाढला होता. यामुळे शनिवारी (३ जानेवारी) ९.१ अंशावर असलेला किमान तापमानाचा पारा रविवारी ५.४ अंशाने वाढून १५.५ वर पोहोचला होता. तर दिवसाचा पारा रविवारी २९ अंश सेल्सिअस इतका होता..

मात्र या आठवड्याच्या सलग दुसऱ्या दिवशी पारा घसरला. सोमवारी जळगावचे किमान तापमान १३ अंश सेल्सिअसपर्यंत होते. किमान तापमानासोबतच दिवसाच्या तापमानातही घसरण झाली होती. कमाल तापमानाचा पारा सोमवारी २६ अंशांपर्यंत घसरले होते. तर मंगळवारी किमान तापमानात पुन्हा ३ अंशांनी घसरून १० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. तर कमाल तापमान २६.८ अंश सेल्सिअस इतके होते.

दरम्यान, तापमानातील घसरणीसह थंडी वाऱ्यामुळे जळगावकरांना पुन्हा हुडहुडी भरली आहे. आगामी काही दिवसांत जिल्ह्याचा किमान पारा १० ते १२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. मात्र, वाऱ्याचा वेग जास्त असल्याने जरी तापमान १० अंशांच्या पुढे राहील तरी प्रत्यक्ष जाणवणारा गारठा अधिक राहण्याची शक्यता आहे.


