जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जानेवारी २०२४ । उत्तर भारतामध्ये शीतलहरी आल्या आहेत, याचा परिणाम देशभरातील तापमानावर होत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमानात घट झाल्याने अक्षरश: हुडहुडी भरविणारी थंडी जाणवत आहे. मागील काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यासह खानदेशात थंडीचा गारठा वाढला आहे.
जळगावचे गुरुवारी २५ जानेवारी रोजी किमान तापमान हे ९.३ अंश सेल्सिअस इतके होते. साधारणत: नोव्हेंबर ते फेब्रुवारी अशा चार महिन्यांत आपल्याकडे थंडीचा मोसम असतो. डिसेंबर महिन्यात थंडी जाणवते, असाही नेहमीचा अनुभव. परंतु, यंदा संपूर्ण डिसेंबर महिना आणि जानेवारीचा पहिला पंधरवडा थंडीविनाच गेला. डिसेंबरअखेर थंडी वाढेल, अशी शक्यता होती. मात्र, तसे झाले नाही.
आणि थंडीचा मोसम संपत आलेला असताना ऐन जानेवारीच्या अखेरीस थंडी वाढली आहे. गेल्या तीन- चार दिवसांपासून जळगावात थंडीचा कडाका वाढला आहे. यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच एवढी थंडी पडली आहे. विशेष म्हणजे, पहाटे आणि रात्री हुडहुडी भरविणारी थंडी असते. भर दिवसा उन्हातही गारठा जाणवतो, अशी सध्याची स्थिती आहे.
दरम्यान, उत्तर भारतात २५ आणि २८ जानेवारी पुन्हा चक्रवात येणार असल्याचा अंदाज असून आगामी पाच दिवस थंडीचा कडाका राहणार असल्याचा अंदाज पुणे हवामान खात्यातील सेवानिवृत्त तज्ज्ञांनी वर्तविला आहे.