जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२५ । जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना भरीव प्रमाणात नुकसान भरपाई देण्यात येईल, त्यासाठी नियमांची अडचण येऊ दिली जाणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिला.जळगाव विमानतळावर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधतांना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या, पाचोरा, भडगाव, जामनेर, मुक्ताईनगर, भुसावळ, जळगाव, एरंडोल या तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेऊन लवकरात लवकर मदत दिली जाईल असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून नुकसानी संदर्भात फार काही निकषात कोणाला न अडविता सर्वांपर्यंत मदत पोहोचली पाहिजे असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. नुकसान भरपाईसाठी फक्त नुकसानाची नोंद असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी आपले नुकसानीचे फोटो स्वतः काढले असतील तेदेखील आम्ही मान्य करू असे त्यांनी यावेळी सांगितले.
नुकसानी संदर्भात राज्यातील ज्या भागांचे पंचनामे अहवाल शासनाकडे प्राप्त झाले आहेत त्यांच्यासाठी शासनाने या अगोदर २ हजार ३०० कोटी रुपये दिले असून इतर भागांचे पंचनामे शासनास प्राप्त झाल्यावर आवश्यक मदत करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. अतिवृष्टीच्या आपत्ती काळात स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाने धीर देऊन मदत केल्याबद्दल यावेळी अतिवृष्टीग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.








