जागरूक जळगावकरांनो तुम्हाला तुमचं शपथपत्र माहितीये का?
जळगाव लाईव्ह न्यूज | २ ऑक्टोबर २०२१ | जळगाव शहराची दयनीय अवस्था सगळ्यांनाच माहिती आहे. जळगाव शहरात लवकरच रस्ते होतील असे सांगत सत्तापालट झाला मात्र रस्ते काय होत नाहीयेत. यामुळे जळगाव शहरात रे नागरिक त्रस्त आहेत. यामुळे सामाजिक कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी जळगाव शहरातील नागरिकांचे एक शब्द पत्र लिहिले आहे
शपथपत्र –
————————
मी पूर्ण शुद्धीत, कुठल्याही प्रकारचे नशापाणी न करता असे शपथपत्र लिहून देताे की –
१. मी जळगांव चासमाधानी नागरिक असून माझी काेणत्याही प्रशासनाबद्दल, पक्षाबद्दल, नेत्याबद्दल, कंत्राटदाराबद्दल, अधिकाऱ्याबद्दल कसलीही तक्रार नाही.
२. पावसात पाणी तुंबते ते पाऊस पडण्यामुळेच, याची मला जाणीव असून रस्ते उखडतात ते बेजबाबदार वाहन चालकांमुळेच हे माझ्या लक्षात आलेले आहे. रस्त्यावर धूळ उडते ती वाहने वेगात धावण्यामुळेच हे सत्यही मला अमृत योजनेने शिकविले आहे.
३.जळगांव ला दर चार-पाच दिवसांआड पाणी येते यात महापालिकेचा काहीही दोष नाही, तो दोष पाण्याचा आहे आणि समांतर जलवाहिनी हा विषय फक्त निधी मिळविण्यापुरता मर्यादित असून त्याचा प्रत्यक्ष जलवाहिनीशी काहीच संबंध नाही, या बाबत मला पुरेसे ज्ञान मिळालेले आहे.
४. शहरात तयार करण्यात आलेले सिमेंटचे रस्ते हे नागरिकांच्या साेयीसाठी नसून संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या कर्तृत्त्वाला वाव मिळावा, त्यांची उन्नती व्हावी यासाठी तयार करण्यात आले आहेत, या बाबत माझ्या मनात कसलीच शंका उरलेली नाही.
५. या रस्त्यांचे साईड मार्जीन हे गरजू नागरिकांनी स्वतःच स्वखर्चाने भरून घ्यायचे असून संबंधित कंत्राटदारांनी त्याचेच फोटो दाखल करून ती बिले काढून घ्यायची असतात हा नियम करण्यात आल्याचेही मला सांगण्यात आले आहे. त्याविषयी मी समाधानी आहे.
६. हे शहर जसेही आहे ते चांगलेच आहे… त्याला चांगलेच म्हणायला पाहिजे याची शिकवण मला सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी मिळून दिलेली आहे. या विषयात कोन्हीही गुंडगिरी वगैरे करीत नाही, हे ही मला माहिती असून या बद्दल मी त्यांचा आभारी आहे.
७. निवडणुकीच्या तोडांवर खान – बाण – भगवा – हिरवा – निळा – संमिश्र असे वेगवेगळे रंग उधळले गेले तरी सप्तरंगाचे चक्र वेगाने फिरल्यानंतर त्याचा फक्त पांढराच रंग दिसताे तसे आमच्या शहरातील पक्षांचे आहे, या बद्दल माझी कसलीच तक्रार नाही. `मानवाचे अंती एक गोत्र` असे कुठल्यातरी एका कवी किंवा तत्सम व्यक्तीने लिहून ठेवले ते सत्य आहे असे मी मानतो. दानवांच्या बाबतीतही असेच असेल हे ही मी समजू शकतो
८. विजेपासून पाण्यापर्यंत, रस्त्यांपासून गटारांपर्यंत, इमारतींपासून खड्ड्यांपर्यंत, आराेग्यापासून स्मशानापर्यंत कुठे कुठे शेण खाता येऊ शकते याचे आमच्या नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना असलेले ज्ञान अगाध असून या बाबत ते साऱ्या जगाला मार्गदर्शन करू शकतील असा विश्वास मागील ३ दशकांच्या या शहरातील वास्तव्यात माझ्यात निर्माण झाला आहे.
९. यामुळेच मला माझ्या शहराचा अभिमान आहे. त्या बद्दल मी सर्व अधिकारी, नेते, कार्यकर्ते, कंत्राटदार यांचा शतशः ऋणी आहे.
१०. या साऱ्या दरम्यान मला जो काही त्रास होतो आहे असे अधूनमधून वाटते, ते माझे प्राक्तन असून माझ्या पूर्वजन्मीच्या पापांची शिक्षा भोगण्यासाठी मी या शहरात वास्तव्य करीत आहे हे मी विनातक्रार मान्य करतो.
११. मी कालही या विरोधात काही बोललो नव्हतो, आजही काही तक्रार करणार नाही आणि उद्याही माझी कसलीच तक्रार असणार नाही.
१२. माझ्या या लेखनामुळे कुणाचे मन दुखावले असेल, त्रास झाला असेल, राग आला असेल तर कृपया उदार मनाने मला क्षमा करावी. आपण सगळे थोर आहात. हेच थोरपण आपण स्मशानात जाईस्तोवर जपावे आणि जमेल तेवढ्या लवकर आपण त्या गंतव्यस्थानी पोहोचावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
धन्यवाद.
दीपककुमार पी. गुप्ता
जळगांव चे
एक सामान्य नागरिक