जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२२ । बंद घरे चोरट्यांसाठी पर्वणी ठरत असून चाळीसगाव तालुक्यातील नवेगाव मेहुणबारे येथे झालेल्या धाडसी घरफोडीने खळबळ उडाली आहे. दोन लाख सहा हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरी प्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
घर बंद असल्याची साधली संधी
सुरेश अभिमन कोकनदे (धनगर) यांच्या आत्या विमलबाई पुंडलिक निकम या नवेगाव मेहुणबारे येथेच वास्तव्यास असून त्या घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्याने चोरट्यांनी सोमवार, 14 नोव्हेंबर रात्री 9 ते मंगळवार, 15 नोव्हेंबर सकाळी 11 वाजता दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडले. चोरट्यांनी घरातील गोदरेज कपाटातील लॉकरमधील एक लाख 50 हजारांची रोकड आणि 56 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण दोन लाख सहा हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सुरेश कोकनदे यांनी मेहुणबारे पोलिसात तक्रार दिल्याने अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलि निरीक्षक विष्णू आव्हाड करीत आहे.