बालरंगभूमी परिषदेचा विशेष मुलांचा महोत्सव ‘यहाँ के हम सिकंदर’
जळगाव लाईव्ह न्यूज । दिव्यांग नसून दिव्य असणाऱ्या मुलांसाठी कार्य करणारे सर्वच शिक्षक महान आहेत. या मुलांसाठी ते घेत असलेल्या अपार मेहनतीला माझा सलाम. या मुलांसाठी मलाही काही करता आले तर त्यासाठी मी सदैव तयार आहे. बालरंगभूमी परिषद या विशेष मुलांसाठी करत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार उद्योजक रजनीकांत कोठारी यांनी काढले. बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती आयोजित व जळगाव जिल्हा शाखा संयोजित दिव्यांग महोत्सव ‘यहाँ के हम सिकंदर’ या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाच्या ऑडिटोरियममध्ये बालरंगभूमी परिषदेचा हा विशेष मुलांच्या कलाविष्काराचा महोत्सव रंगला. प्रारंभी सकाळी १० वाजता महोत्सवाचे उद्घाटन नटराज पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उद्योजक रजनीकांत कोठारी, बँक ऑफ महाराष्ट्राचे प्रबंधक प्रविणकुमार सिंह, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी पद्मनाभ म्हस्के, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग जळगावचे सहाय्यक संचालक योगेश पाटील, बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीचे कोषाध्यक्ष नंदकिशोर जुवेकर, प्रभारी प्रमुख कार्यवाह योगेश शुक्ल आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जळगावचे प्रमुख कार्यवाह विनोद ढगे यांनी केले.

या महोत्सवात जिल्ह्यातील १९ विद्यालयातील ३८० दिव्यांग बालकलावंतांनी सहभाग घेत, नृत्य – नाट्य – गायन – चित्रकला आदी कलांनी उपस्थित प्रेक्षकांना भारावून सोडले. समारोप प्रसंगी सहभागी प्रत्येक बालकलावंतांचा प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे सहभागी विद्यालय व संस्थांचा सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. या दिव्यांग मुलांसाठी कार्य करणाऱ्या प्रत्येक विद्यालयातील ५ शिक्षकांचाही यावेळी बालरंगभूमी परिषदेतर्फे सत्कार करण्यात आला.
महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी बालरंगभूमी परिषदेचे कोषाध्यक्ष सचिन महाजन उपाध्यक्षा नेहा पवार, कार्यकारिणी सदस्य मोहीत पाटील आकाश बाविस्कर, सुदर्शन पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे,सुरेखा मराठे अवधूत दलाल, संतोष चौधरी, हर्षल पवार, पंकज बारी आदींनी परिश्रम घेतले.


