चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरण : धानोरा, शिरपूरच्या दोघांविरुद्ध गुन्हे दाखल
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२१ । केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ऑनलाइन चाइल्ड पोर्नोग्राफी आणि लैंगिक छळ संदर्भात देशभरातील १४ राज्यांत ७७ ठिकाणी छापे टाकले. ऑनलाइन बाल लैंगिक छळ व शोषणाच्या घटनांमध्ये सहभागी ८३ जणांविरुद्ध २३ गुन्हे दाखल केले. यात दिल्लीत दाखल गुन्ह्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील धानोरा येथील एकाचा व धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील दोघांवर गुन्हे दाखल केल्याचे समाेर आले आहे.
दीपक नारायण पाटील (रा. पाटीलवाडा, अडावद, ता. चोपडा, जि. जळगाव) व राहुल भटा पावरा (रा.सांगवी जोड्या, ता. शिरपूर, जि. धुळे) या दोघांना नोटीस देण्यात आली आहे. मंगळवारी सीबीआय पथकाने जळगाव, धुळ्यात कारवाई केल्याची माहिती समोर आली हाेती. मात्र, या प्रकरणात स्थानिक पोलिस यंत्रणा अनभिज्ञ होती. बालकांवरील लैंगिक शोषणाचे व्हिडिओ प्रसारित करण्यासंदर्भात सीबीआयने १४ नोव्हेंबरपासून देशभरात तपासणी सुरू केली आहे. यात अनेक जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जळगाव व धुळे जिल्ह्यात चौकशी करण्यासाठी पथक दाखल झाले होते. यात त्यांनी दीपक पाटील व राहुल पावरा या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या दोघांवर माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम ६७ बी, १२० बी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचे मोबाइल, लॅपटॉप पोलिसांनी जप्त केले असल्याची माहिती समोर आली आहे.
कलम ६७ बी काय?
माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम ६७ बी मध्ये लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबाबत शिक्षेची तरतूद केली आहे. यात जाे कोणी इलेक्ट्रॉनिक्स स्वरूपात कामवासना उद्दिपीत करणाऱ्या कृतीमध्ये किंवा वर्तणुकीत लहान मुलांचा समावेश असलेले चित्रण आहे असे साहित्य प्रसिद्ध करेल, त्याची व्यवस्था करेल, डिजिटल प्रतिमा निर्माण करेल. अशा कृती करणारा व्यक्ती. अशा प्रकारच्या गुन्ह्यात दोषी आढळून येणाऱ्या आरोपीस सात वर्षे कारावास व दहा लाख रुपयांच्या दंडापर्यंतची शिक्षा देण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे.
जिल्ह्यात सहा महिन्यात सात गुन्हे दाखल
महाराष्ट्र सायबर सेलतर्फे वर्षभर ही तपासणी सुरू असते. यात दर सहा महिन्यांनी ते सर्व जिल्ह्यातील सायबर सेलकडे सीडी पाठवतात. त्यात संशयितपणे आढळून आलेले सोशल मीडिया अकाऊंट, व्यक्ती यांची माहिती दिलेली असते. जळगाव जिल्ह्यासह सहा महिन्यांपूर्वी मिळालेल्या सीडीत एकूण १० संशयित प्रकरणे होती. चौकशीअंती यातील तीन प्रकरणांमध्ये तथ्य आढळून आले नाही. तर उर्वरित सात प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत