जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२२ । धरणगाव शहरातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात आई-वडिलांसह नवरदेव मुलगा, सासू-सासरे यांच्या सह ९ जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार दि. १० जानेवारी २०२२ रोजी फिर्यादी ही अल्पवयीन असल्याचे संशयितांना माहीत असून देखील संबंधितांनी तिचा विवाह संमतीवीना राहुल राजु ढालवाले (रा. शेतपुरा चोपडा) याच्याशी मुलीचे नातेवाई व मुलाचे नातेवाईक अशांनी संगनमताने लावून दिला. राहुल राजू ढालवाले (नवरदेव), राजू रामदास ढालवाले (सासरा), जनाबाई राजू ढालवाले (सासू), सुनील राजू ढालवाले (जेठ), अर्जुन राजू ढालवाले (जेठ), (सर्व रा. शेतपुरा चोपडा ता. चोपडा) यांच्यासह मुलीचे आई, वडील, काका,काकू यांच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार तसेच संरक्षण अधिकारी चंद्रशेखर रविंद्र सपकाळे यांनी दिलेले रिपोर्टने गुन्हा दखल करण्यात आला आहे. तक्रारी जबाबावरुन संरक्षण अधिकारी धरणगाव चंद्रशेखर सपकाळे यांनी दिलेले रिपोर्टने बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौ. योगेश जोशी हे करीत आहे.