⁠ 
शनिवार, मार्च 2, 2024

जिल्ह्यात पाणी कपात करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश; पाणी पुरवठा लांबणार

जळगाव लाईव्ह न्यूज| २३ ऑगस्ट २०२३| जळगाव जिल्ह्यात पाणी साठ्याची पातळी बघता मुख्यमंत्र्यांनी उपाययोजना करण्याबाबत निर्देश दिले आहेत. यंदा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे उन्हाळ्यात जनतेला जल संकटांना सामोरे जाऊ लागू नये त्यासाठी आतापासूनच उपाययोजना करा. धरणांमध्ये साठा पुरेसा होत नाही तोपर्यंत पाणी कपात करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

त्यानुसार सर्व जळगाव जिल्ह्यातील सर्वच गावात पाणी कपातीचे धोरण हाती घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. त्यामुळे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेतील पाणी पुरवठा लांबणार असल्याचे निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत राज्यभरातील पावसासंदर्भात मंगळवारी ऑनलाईन बैठक घेण्यात आली.

त्यात जळगावचा आढावा घेताना जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात रावेर वगळता दक्षिण भागातील सर्वच गावांमध्ये पुरेसा जलस्त्रोत नाही. तसेच धरण आणि तलावांमध्ये ही पुरेसा जलसाठा नाही. १३ विहीरी अधिग्रहित करून जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा केला जात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

शहरात पाणी कपातीचे धोरण हाती घेतले जाते. मात्र सध्या जिल्ह्यात नाजूक अवस्था आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनीही पाणी कपातीचे धोरण हाती घ्यावे, अशा सूचना गुलाबराव पाटील यांनी केल्या. पाणी साठा मुबलक उपलब्ध झाल्यास दुसऱ्या दिवशी पाणीपुरवठा पूर्ववत करावा, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

रावेर परिसरावर जल संकट नाही. येत्या उन्हाळ्यातही रावेरला सुरळीतपणे पाणी पुरवठा करता येणे शक्य आहे. त्यामुळे रावेर वगळता जिल्ह्यातील सर्व शहरांचा ग्रामपंचायतींना पाणी कपातीचे धोरण हाती घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यानुसार दररोज पुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतींना एक दिवसाआड ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करावे लागणार आहे. तसेच अन्य शहरात आधीच दोन ते आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे तोही पाणीपुरवठा यापुढे लांबणार आहे.