जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२२ । मागील काही दिवसापासून भोंग्यावरून व हनुमान चालीसा हनुमान चालीसा पठणावरून राजकारण पेटलं आहे. याच वरून विरोधकांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले जातंय. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
हिंदुत्वाच्या नव्या खेळाडूंकडे लक्ष देत नाही. यांच्याकडून कधी मराठीचा खेळ कधी हिंदुत्वाचा खेळ केला जात आहे. शिवसेना हिंदुत्ववादी आहेच, असे भोंगेधारी, पुंगीधारी खूप बघितले, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री ठाकरे ‘लोकसत्ता’च्या एका कार्यक्रमात बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, हिंदुत्वाच्या नव्या खेळाडूंकडे लक्ष देत नाही. कधी मराठीचा खेळ कधी हिंदुत्वाचा खेळ सुरु आहे. असे खेळ महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिलेत. फुकटात करमणूक होत असेल तर का नाही पाहायची. शिवसेना हिंदुत्ववादी आहेच. असे भोंगेधारी, पुंगीधारी खूप बघितले. हिंदुंना नासमज समजू नका. आपल्या देशात हिंदू अनेक भाषा बोलतात. आम्ही मराठी म्हणून बाकीच्यांना हाकलून द्यायचं. चाललं नाही की परत बोलवायचं. असले माकडचाळे चालतात हे लोकांना समजतात. आम्ही हिंदू आहोत हे सांगावं लागत नाही. वेगवेगळे झेंडे का फडकावे लागतायत, आम्ही झेंडा बदललेला नाही. अस्तित्व असलं तर टिकवण्याची गरज असते, असं ते म्हणाले.
भोंग्याच्या वादावर बोलताना ते म्हणाले की, भोंग्यांचा कोर्टाचा निकाल सर्वधर्मियांना लागू आहे. आपल्याला राज्याला पुढे न्यायचं आहे. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री भोंगे काढतात तर महाराष्ट्रात का नाही असं म्हणतात. उत्तर प्रदेशात प्रेतंही नदीत फेकली होती. तेव्हा काम न करता हे करून लोकप्रिय होणार असतील तर त्यांचं त्यांना लखलाभ आहे. सर्वांनाच डेसिबलचं बंधन पाळावं लागेल, असं ते म्हणाले. अजानच्या मागून अजानतेपणानं जे चाललंय ते जाणून घ्या, असं ते म्हणाले.