जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२५ । भुसावळ मार्गे धावणाऱ्या दोन महत्वाच्या गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. गोरखपूर रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या देखभाल व दुरुस्ती कामामुळे मध्य रेल्वेतर्फे गोरखपूरकडे जाणाऱ्या दोन गाड्यांच्या मार्गात हा तात्पुरता बदल करण्यात आला आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूरदरम्यान धावणारी गोदान एक्स्प्रेस आता ७ डिसेंबर २०२५ पर्यंत गोरखपूरऐवजी गोंडा येथे पोहोचेल व तेथूनच सुटेल. क्र. ११०५५ लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दररोज सकाळी १०.५५ वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी रात्री ११ वाजता गोंडा येथे पोहोचेल. तसेच क्र. ११०५६ गोंडा येथून रात्री ३.१० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी १५.३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपूरदरम्यान धावणारी सुपरफास्ट एक्स्प्रेस ही ५ व ६ डिसेंबर २०२५ पर्यंत गोरखपूरऐवजी आझमगडपर्यंत चालविण्यात येणार आहे. क्र. २०१०३ लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ५.२३ वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी १५.१५ वाजता आझमगड येथे पोहोचेल आणि क्र. २०१०४ ही गाडी आझमगड येथून संध्याकाळी १८.५० वाजता सुटेल व तिसऱ्या दिवशी ०४.३५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या तात्पुरत्या बदलानुसार प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत वेळापत्रकाची व वेबसाइटची खात्री करून प्रवास करावा, असे मध्य रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.







