जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑक्टोबर २०२१ । अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी प्रदीप गुलाबराव पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा राष्ट्रीय जनरल सचिव के.सी. वेणुगोपाल यांनी गुरुवारी ७ ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी केली आहे.
जळगाव ग्रामीणचे अध्यक्ष म्हणून प्रदीप गुलाबराव पवार यांची नियुक्ती केली आहे. प्रदीप पवार हे भडगाव येथील देशमुखवाडीचे रहिवासी असून त्यांच्या निवडीमुळे काँग्रेस कमिटीमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या निवडीबद्दल प्रदेश उपाध्यक्ष शिरीष दादा चौधरी, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, राज्य पदाधिकारी डी.जी. पाटील, मावळते जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप भैय्या पाटील, जिल्हा सरचिटणीस जमील शेख यांच्यासह मनोज सोनवणे, ज्ञानेश्वर कोळी, उद्धव वाणी, प्रमोद घुगे, भाऊसाहेब सोनवणे, समाधान पाटील जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, यांनी अभिनंदन केले आहे.
“पुढील काळात अखिल भारतीय काँग्रेस पक्षाला सुवर्ण दिवस आणण्यासाठी मी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने प्रयत्न करेन. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न शासन दरबारी मांडून सोडवण्यासाठी पाठपुरावा करेल. देशभरात भाजप सरकारमुळे सामान्य जनतेचे जगणे मुश्कील झाले असून त्याविरोधात आवाज वाढवण्यासाठी मी प्रयत्नशील राहील. काँग्रेस पक्षाची वाढ करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेऊन तरुणांचा भरणा काँग्रेसमध्ये करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील” अशी प्रतिक्रिया निवडीनंतर नूतन जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी माध्यमांना दिली आहे.