जळगाव लाईव्ह न्यूज| ७ ऑगस्ट २०२३। भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम असलेलं चांद्रयान-३ आता चंद्राच्या आणखी जवळ पोहोचलं आहे. शनिवारी चंद्राच्या बाहेरच्या कक्षेत प्रवेश केलेल्या चांद्रयानाला आता आतील कक्षेत ढकलण्यात इस्रोला यश मिळालं आहे. चांद्रयान आता चंद्राभोवती १७०x४३१३ किलोमीटर कक्षेमध्ये फिरत आहे.
हे चांद्रयान आता या कक्षेमध्ये चंद्राभोवती फेरी मारेल. यानंतर पुढे ९ ऑगस्ट रोजी ते आणखी आतल्या कक्षेत ढकलण्यात येईल. १४ जुलै रोजी अंतराळात झेप घेतलेलं चांद्रयान आता चंद्राच्या अगदी जवळ पोहोचलं आहे. सर्व काही सुरळीत पार पडल्यास २३ ऑगस्ट रोजी हे चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर लँड करेल.
पृथ्वीवरुन ज्याप्रमाणे टप्प्या-टप्प्याने चांद्रयान बाहेर सोडण्यात आलं, त्याचप्रमाणे ते टप्प्या-टप्प्याने चंद्राजवळ नेण्यात येत आहे.
चांद्रयान चंद्राभोवती फेऱ्या मारत एक-एक कक्षेतून पृष्ठभागाच्या जवळ जात आहे. १७ ऑगस्ट रोजी हे चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागापासून १०० किलोमीटर उंचीवर स्थिरावेल. यानंतर २३ ऑगस्टला लँडिंगचा प्रयत्न होईल. दरम्यान, चांद्रयान-३ काल चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत पोहोचलं. यावेळी ‘मी चंद्राचं गुरुत्वाकर्षण अनुभवत आहे’ अशा आशयाचा संदेश चांद्रयानाने पाठवला होता. हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा होता. यासोबतच, चांद्रयानाने चंद्राचा पहिला व्हिडिओ देखील शेअर केला आहे.