⁠ 
शनिवार, मे 4, 2024

राज्यावर उद्यापासून अवकाळीचे संकट; विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२२ । थंडीने कुडकुडलेल्या महाराष्ट्राला आता रखरखीत उन्हाचे चटके बसू लागले असतानाच हवामानात होत असलेल्या स्थित्यंतरामुळे राज्यातील बहुतांश भागांना येत्या साेमवारपासून पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अवकाळी पावसासाेबतच साेसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याने रब्बीच्या पिकांवर अस्मानी संकटाचे सावट राहू शकते.

राज्यातील बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा ३६ अंशांपुढे गेला आहे. जळगाव जिल्ह्याचा पारा देखील ३६ अंश इतका आहे. त्यामुळे उन्हाचा चटका बसू लागला आहे. मात्र अशातच उद्या सोमवारपासून पुढील तीन दिवस जिल्ह्यासह महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे सावट आहे. ७ ते ९ मार्च या तीन दिवसांत जळगाव जिल्ह्यासह विदर्भ, मराठवाड्यात साेसाट्याचा वारा व अवकाळी पावसाचा अंदाज आहे.

गेल्या चार वर्षापासून जिल्ह्यात ऐन मार्च महिन्यात रब्बीची पीके आस्मानी संकटाचे बळी पडत आहे. विशेष गहू, फळबागा आणि मका या पिकांचे माेठ्या प्रमाणावर नुकसान हाेत आहे. आता अशातच पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आल्याने काढणीला आलेल्या गहू, हरभऱ्यासह रब्बी हंगामातील अन्य पीकांचे नुकसान हाेण्याची शेतकऱ्यांना धास्ती आहे.