जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जानेवारी २०२३ । राज्यात सातत्याने हवामानात बदल जाणवत आहे. एकीकडे राज्यातील काही ठिकाणी थंडीचा जोर कायम असून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी एक बातमी आहे. राज्यात आज शनिवार आणि उद्या रविवारी थंडीचा जोर थोडा कमी होणार असून मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात कोकण व विदर्भ वगळता नाशिक, धुळे, जळगाव, नगर, नंदुरबार, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, साताऱ्यासह मराठवाड्यात २ दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे. यामुळे शनिवार व रविवारी विजांसह अवकाळी पावसाची शक्यता आहे.
अशात याने शेतीचे नुकसान होऊ शकते. राज्यात सातत्याने हवामानात बदल जाणवत आहे. त्यामुळे काही ठिकाणी कांदा पिकावर करपा रोगाचा फैलाव होत आहे. जर मुसळधार पाऊस झाला तर कांदा पिकाचे आणखीन जास्त नुकसान होऊ शकते. या आधी परतीच्या पावसाने खरीप हंगामात पिकांच मोठं नुकसान झालं आहे.
दरम्यान, दुसरीकडे मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडसह अकोला, अमरावती, गडचिरोली, नागपूर, गोंदिया, वर्धा या जिल्ह्यांत थंडीचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. १ फेब्रुवारीपासून वातावरण पूर्वपदावर येऊन किमान तापमानात घसरेल. यामुळे थंडी वाढण्याचा अंदाज खुळे यांनी व्यक्त केला आहे.
किमान तापमान
औरंगाबाद १३.४, परभणी १४.५, पुणे १५.४, जळगाव १५.५, महाबळेश्वर १५.६, जालना १६.०, मालेगाव १६.४, नाशिक १६.५, डहाणू १६.८, सोलापूर १७.०, बारामती १७.३, माथेरान १७.६, मुंबई १८.९, कोल्हापूर १९.५