ऑक्टोबर हिटचे चटके पण पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता; पहा कोणत्या भागांमध्ये बरसणार

पुणे : राज्यामध्ये ऑक्टोबर हिटचे चटके जाणत आहेत. सध्या विदर्भातील तापमान सरासरी 35 अंशांवर आहे. तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रातही तापमानाचा पारा 34 अंशांवर आहे. पुढील दहा दिवस राज्यात ऑक्टोबर हिटच्या झळा जाणवतील, त्यानंतर तापमानामध्ये घट होऊन थंडीला सुरूवात होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. यामुळे येत्या 24 तासांतही राज्यासह देशात विविध ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्रात कोल्हापूरसह कोकण किनारपट्टी या भागांमध्ये पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण परिसरात पुढील दोन ते तीन तासांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 18 ऑक्टोबरपर्यंत अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता असून, त्यानंतर थंडीचा कडाका सुरू होणार आहे. काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहील, तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तमिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाने 16 ते 18 ऑक्टोबर या दोन दिवसांमध्ये काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख, या भागातही मुसळधार पावसासह हिमवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.