जळगाव लाईव्ह न्यूज । विक्रांत पाटील, जेष्ठ पत्रकार । यापूर्वी अधूनमधून वारंवार येणाऱ्या, दोन वर्षांपूर्वीही तडाखा देऊन गेलेल्या पुरापासून राजकारण्यांनी, प्रशासनाने कोणताही धडा न घेतल्यानेच चाळीसगाव शहर महापुराच्या गर्तेत! आता निसर्गावर खापर फोडतील; पण शहरात नद्यांचा आवळलेला गळा, नदीपात्रातील अतिक्रमण, नैसर्गिक प्रवाहाच्या अडवलेल्या वाटा; तर ग्रामीण भागात अनियंत्रित वाळू उपशाचे पाप कोणाचे? या पाप्याच्या पितरांनी बुडविले चाळीसगाव शहर व ग्रामीण भाग….
एक पोस्ट पाहिली कुठेतरी –
महाड, चिपळूणनंतर आता कन्नड, चाळीसगाव.
विकास चार आण्याचा, आपत्ती व्यवस्थापन बारा आण्याचे!
दोन वर्षांपूर्वी, 2019 मध्ये ऑक्टोबर महिन्यात तितूर नदीला असाच अचानक पूर आला होता. ती आजच्या घटनेची नांदी होती. निसर्गाने धोक्याची घंटा वाजविली होती. मात्र, तेव्हा पाहणीची नाटके, प्रशासकीय पोपटपंची, आश्वासनांची बोलबच्चनगिरी केली गेली. त्यात काही गांभीर्य असते आणि त्या घटनेपासून काही धडा घेऊन उपाययोजना केली गेली असती, तर आजची हानी निश्चित टळू शकली असती किंबहुना शहरावर अशी महापुरात बुडण्याची वेळच आली नसती. आता कदाचित ढगफुटी, ढगफुटी बोंब उठवून त्या माथी खापर फोडण्याचा प्रयत्न होईल. मात्र, हीही स्थानिक आवई आहे. भारतीय हवामान खात्याने ढगफुटीला अजून कोणताही अधिकृत दुजोरा दिलेला नाही. “सतर्क”च्या प्राथमिक अभ्यासात, ही ढगफुटी नसून उंच ढगांच्या एकत्रित क्षेत्रातून झालेली अतिवृष्टी असल्याचे समोर आले आहे. कदाचित राजकीय दबावातून नंतर ढगफुटीचा सरकारी सिग्नल मिळेलही; पण हे मुळात झोपून राहिलेले चमको राजकारणी आणि निर्लज्ज प्रशासनाचे अपयश आहे. याचा अर्थ जनता यातून सुटत नाही. तिचीही तितकीच जबाबदारी आहे. नंद्यांचा गळा घोटून त्यांचे पात्र अरुंद केले जाते, नंद्यांच्या गटारी बनवल्या जातात, नदीपात्रात अतिक्रमण केले जाते, ते दिवसेंदिवस वाढत जाते… यातून एक दिवस नेहमीच्या निसर्ग वाटा बंद झालेला पाण्याचा प्रवाह मग मनावाच्या वस्तीत जागा दिसेल तिथे घुसतो. मुंबईत मिठी नदीने हा धडा दिला होता. चाळीसगावात आज तितूरने दिला आहे. मुंबईत तेव्हा नव्या पिढीला व अनेकांना मिठी, दहिसर, पोईसर व ओशिवरा या नद्या शहरातून वाहतात, हे कळले होते. चाळीसगाव म्हणजे गिरणा इतकेच माहिती असलेल्या जळगाव जिल्हावासियांना आज कळले असेल की या शहरात तितूर आणि डोंगरी नावाच्याही दोन नद्या आहेत. चाळीसगावातून बाहेर गेलेल्या बहुतांश नव्या पिढीला कदाचित ते आज कळले असेल. उर्वरित इतरांना त्या निमित्ताने आपल्या गावातील नद्यांचे स्मरण झाले असेल.
निसर्गाच्या या तडाख्यानंतरही निर्लज्ज व बेशरम राजकीय चमकोगिरी कदाचित केली जाईल. मात्र, चाळीसगावकरांनी आता गचांडी धरून राजकारणी व प्रशासनाला जाब विचारायला हवा. दोन वर्षे ही मंडळी झोपून राहिली आणि धोक्याच्या घंटेचा आवाज देऊनही जाग न आलेल्या शहराला आज या नंद्यानी आपल्या कवेत घेऊन धडा दिला. साधारणतः कुठलेही सौंदर्यीकरण अथवा नदीपात्रातील बांधकाम, हे त्या नदीचा गळा आवळून टाकते. नैसर्गिक प्रवाहात बाधा आणते. मग कधीतरी हे पाणी वढाय ढोराप्रमाणे उधळते. नदीपात्रातील बांधकामाचे पातक व नदीचा गळा आवळण्याच्या पापाची फळे नाशिक, पुणे शहरही अधूनमधून भोगत असते. हा कागदावर वरवर कितीही चांगला वाटत असला तरी “भकास विकास” असतो. जलतज्ञ राजेंद्रसिंह हे वारंवार अशा नदीच्या गळा घोटण्याच्या प्रयत्नांविरोधात बोलतात. नदीच्या प्रवाहाला मुक्तपणे वाहू देणे, हे कधीही शहराच्या, गावाच्या, परिसराच्या हिताचे असते. माझे पत्रकार मित्र व चाळीसगाव विकास मंचचे प्रफुल्ल साळुंखे यांनी वारंवार हा मुद्दा मांडला आहे. चाळीसगावकरांनी त्याचे गांभीर्य लक्षात घेतले नाही.
याशिवाय, तुषार निकम यांनीही मांडलेला एक महत्त्वाचा मुद्दा दुर्लक्षिला गेला. मिशन 500 कोटी लिटर्स जलसाठा अंतर्गत चाळीसगाव तालुक्यात गावोगावी नाला खोलीकरण आणि रूंदीकरण मोहीम राबवून, नदी-नाल्यांचा गाळ काढून, त्यांच्यात झालेले अतिक्रमणे काढून घेतले आणि पाणी साठोप्याचे मोठमोठे साठे तयार केले. त्यामुळे दुष्काळ निवारणासाठी तर फायदा झालाच पण पूर नियंत्रणही झाले. गावोगावी जोरदार वाहून जाणारे पाणी गावातच थांबू लागले. त्यामुळे पुराचा जोर कमी झाला. चाळीसगाव शहरातही तसेच अपेक्षित होते. चाळीसगाव शहरालगत असलेल्या दोन्ही नद्या या खोलीकरण करून घेणे गरजेचे होते, कारण वर्षानुवर्षाचा गाळ साचून त्या उथळ झालेल्या आहेत आणि त्यांच्या लेव्हलला गावाचे रस्ते झाले आहेत. त्याची जाणीव ‘मिशन 500 कोटी लिटर्स जलसाठा’ने तत्कालीन मुख्याधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांना करून दिली होती.
नदीमध्ये वाढलेले अवास्तव बाभूळ, झालेली अतिक्रमणे आणि नदीचा उथळपणा यासाठी नदीचे खोलीकरण होणे गरजेचे आहे, असे प्रशासनाला सुचविले गेले होते. मिशनचे मशीन्सही होते, प्रशासनाला त्यात फक्त डिझेल टाकायचे आणि नदी खोलीकरणचे काम करून घ्यायचे होते. दुर्दैवाने शहराच्या हिताची पर्वा कुणाला नसल्याने ते झाले नाही. तसे झाले असते तर नदीचे पात्र मोठे व खोल होऊन, नदीच्या लेव्हलला आलेल्या रस्त्यात काही उंची तयार झाली असती आणि पुराचे पाणी थेट शहरामध्ये न जाता सरळ वाहून गेले असते. पण प्रशासनाने याकडे डोळेझाक केली आणि त्याचा परिणाम आता चाळीसगावकरांना भोगावा लागला. जमिनीलगत आलेल्या रस्त्यांमुळे पुराचे पाणी रस्त्यावरून शहरात पोहोचले आणि त्याने जनावरांचा चारा, टपऱ्या वाहून नेल्या, मातीची घरे पाडली, नदीकाठचे मोठे नुकसान केले.
नद्यांचे सुशोभीकरण करणे म्हणजे पर्यावरणाचा ह्रास करणे आहे. यातून फायदा ठेकेदाराचा आणि संबंधित लोकांचा होतो; पण नद्यांचे पात्र छोटे होऊन असे शहराच्या जीवावर उठण्याचे प्रकार होतात. सुशोभीकरण हे नदीत न करता, काठावर केले पाहिजे, हे जोपर्यंत शिकलेल्या लोकांना कळत नाही, तोपर्यंत असे फटके बसत राहतील, ही तुषार निकम यांची भूमिका पटणारी आहे. चाळीसगावकर आता तरी ती समजून घेतील का? हा फटका केवळ यावेळी बसून संपणारा नाही. यापुढे वारंवार, या संकटांना तोंड देण्याची आता तयारी करावी लागणार आहे. आणि हे टाळायचे असेल तर ठोस, प्रामाणिक, सर्वपक्षीय शहर हिताचे निर्णय घ्यावे लागतील. नदी पात्र अरुंद करावे लागेल, त्यातील कच्ची-पक्की अतिक्रमणे उद्ध्वस्त करावी लागतील.
हा झाला शहरी भागाचा प्रश्न. ग्रामीण भागातही अनियंत्रित वाळू उपशाचा प्रश्न मुळावर उठला आहे. यापूर्वी त्याचे गांभीर्य कदाचित गावांनाही लक्षात आले नसेल, पण आता त्यांना ते लक्षात घ्यावे लागेल. केवळ निसर्गावर खापर फोडून सुटका नाही. साऱ्या गावाने मिळून वाळूतस्करांना हाकलून द्यावे लागेल, गावागावात ग्राम ठराव करून वाळूउपशाच्या ठेक्यांविरोधात दंड थोपटून उभे राहावे लागेल. अवैध वाळू उपशातून काहींचे उखळ पांढरे होत असेलही; पण या नतद्रष्टांना आता गावाने उखळात घेऊन ठेचून काढण्याची वेळ आली आहे. आपल्या गावचा, परिसरातील नैसर्गिक भवताल वाचविला तरच पुढे आपण जगणार आहोत. हिंगोणा ग्रामस्थांनी अनेक दिवस वाळू तस्करांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी उपोषण केल्याचे आठवते. त्यात लोकप्रतिनिधींचा कितपत पाठींबा होता, याचाही हिशेब आता व्हायला हवा. प्रफुल्ल साळुंखे यांनी वाळू उपशामुळे नदीपात्रात होणारे खड्डे कसे शेतातील माती ओढून नेण्याला कारणीभूत ठरतात आणि शेतात पाणी घुसून नाला कसा होतो, याचे विस्तृत आणि मुद्देसूद विवेचन केले आहे. हे सारे ध्यानात घेणे आवश्यक आहे. नुसता निसर्ग कोपत नाही; आपल्या चुकांनी, दुर्लक्ष, बेपर्वाई आणि बेजबाबदारीने त्याचे थोडेसे अनियमित रूपही रौद्र रूप धारण करून मग भयंकर तडाखा देत छेडछाडीचे, त्याच्याशी खेळल्याचे सारे हिशेब वसूल करते.
आता पुन्हा चाळीसगाव शहराकडे वळूया. तितूर नदीला अचानक पूर आल्याने नदीशेजारील अनेक दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरल्याचे व मोठे नुकसान झाल्याची ताजी घटना यापूर्वी दोन वर्षांपूर्वी घडलेली स्मरणात असेल चाळीसगावकरांना. त्यानंतर कुणी काय दिवे लावले, याचा हिशेब विचारण्याची हिंमत हे शहर करणार आहे का? त्याहीवेळी हे लक्षात आले होते, ना की गेल्या काही वर्षंपासून मुसळधार पाऊस पडल्यावर अशी परिस्थिती निर्माण होते. एकदा तर जुन्या नगरपालिकेपर्यंतही त्यातून पाणी पोहचलेच होते की. याचे एक मूलभूत कारण तेव्हाही लक्षात आले होते की – छोट्या गुजरीतील व हॉटेल दयानंदजवळील मोठ्या पुलाला केवळ दोन ठिकाणी पाणी पास होण्यासाठी जागा आहे, त्यामुळे वरून येणारे पाणी जास्त आणि पुलाखालून पास होणारे पाणी कमी होत असल्याने बंधाऱ्याप्रमाणे हे पाणी अडवले जाते. मग ते ओव्हर फ्लो होऊन आजूबाजूला वाट मिळेल तिकडे शिरते, दुकानातही घुसते. याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी तेव्हा केली गेली होती. आश्वासनेही दिली गेली होती, अधिकाऱ्यांना झापलेही गेले होते; मग पुढे काय झाले? दोन वर्षात कुणी काय केले? काही केले असते, तर आजची वेळ नक्कीच आली नसती.
“पालिकेच्या दुर्लक्षामुळे नदीचे पात्रच गायब!* अशी दैनिक “लोकमत”मधील एक बातमीही 2-3 महिन्यांपूर्वीच वाचनात आली होती. त्यात तितूर नदीपात्रात सुशोभीकरणाच्या नावाखाली करण्यात आलेल्या अतिक्रमणांमुळे नदीचे पात्र गायबच झाले, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला होता. पालिकेने शहरातून जाणाऱ्या नदीच्या पात्राची रुंदी निश्चित केलेली नाही. पूररेषेची आखणी केलेली नाही. अशात नदीवर बांधण्यात आलेला चित्रविचित्र आकाराचा लोखंडी पूल व त्याची लांबी पाहता या नदीचे पात्र किती आहे, याचा अंदाज सहज येतो, हे त्या वृत्तात स्पष्टपणे म्हटले होते. पालिकेच्या दुर्लक्षामुळेच नदीचे पात्रच गायब झाले अन् सुशोभीकरण कसले विद्रुपीकरण झाले आहे, हे सत्य आहे. नदीची सफाई आणि खोलीकरण ही कामे वेळोवेळी, योग्य पद्धतीने होणे आवश्यक आहे. आजच्या शहराला बसलेल्या फटक्याचे ते मुख्य कारण आहे.
राष्ट्रीय विद्यालय कन्या शाळाही काल पाण्यात होती. नदीकाठी शाळा बांधकाम धोक्याचं आहे, असे सांगूनही ऐकले गेले नाही. कधी दिवसा अचानक शाळा सुरू असताना पाण्याचा लोंढा आला तर ….. चाळीसगावकर हा विचार करणार आहेत का? विकास जर शहराला विनाशाकडे नेणारा असेल तर तो नसलेला अधिक हिताचा!
नदी स्वच्छतेसाठी यापूर्वी दुकानदार, नागरिकांनी केलेल्या सूचना…
(स्थानिक वृत्तांनुसार)
1. नदीची पूररेषा व सर्व्हे नक्की केला पाहिजे.
2. नदीतील अतिक्रमणे काढली पाहिजेत.
3. नदीपात्रात गटारींचे पाणी सोडणे थांबवावे.
4. नदीपात्रात टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याचा बंदोबस्त करावा.
5. नदी प्रदूषणमुक्त करण्याकडेदेखील लक्ष द्यावे.
6. पावसाळ्यापूर्वी 70 टक्के आणि पावसाळा व त्यानंतरच्या काळात 30 टक्के सफाई करण्यात यावी.
7. शहरात दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी नदी-नाल्यांमधून गाळ उपसण्याचे काम करण्यात यावे.
8. पूर आल्यावर दुकानात पाणी जाणार नाही याची जबाबदारी प्रशासनाने घ्यायला पाहिजे.
थोडासा नद्यांचा भूगोल
चाळीसगाव शहर हे डोंगरी व तित्तूर या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. डोंगरी नदी पाटणादेवीच्या डोंगरात, सह्याद्री पर्वतरांगात, धवल तीर्थापासून उगम पावते. या डोंगरी नदीच्या किनारी उंचावर वसलेले ठिकाण म्हणजे पाटणादेवी तीर्थक्षेत्र. इथेच पुढे आहे गौताळा औट्रमघाट अभयारण्य! तितूर ही पश्चिमेकडून येणारी नदी. चाळीसगाव शहरात दत्तवाडी नजीक या दोन्ही नद्यांचा संगम होतो. त्यानंतर चाळीसगाव शहराच्या मधोमध धावणारी तितूर पुढे गिरणाला मिळते. चाळीसगाव शहराचे दोन मुख्य भाग आहेत – जुने शहर व नवे शहर. या दोन्हीच्या मधून तितूर नदी वाहते. चाळीसगावात तितूर व डोंगरी नदीचा संगम असलेल्या परिसरात लागूनच मस्तानी अम्मा टेकडी दर्गा आहे. याशिवाय, हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असणारा पिर मुसा कादरी ऊर्फ बामोशी बाबांचा दर्गाही जवळच आहे.
फेसबुकवर व्यक्त झालेल्या काही चाळीसगावकरांच्या प्रतिक्रिया
(त्यांच्या शब्दात, जशाच्या तशा)
• नुसतं वाहत्या पाण्यात नारळ सोडून काम अजिबात होत नाही. मग विकासाचा नकली फुगारा फुटल्याशिवाय पण राहत नाही. म्हणून तालुक्यात काहीतरी वेगळं करायचे असेल तर प्रवाहाच्या विरोधात जाऊन काम केले पाहिजे, ही नदी मृत झाली आहे, ती पुन्हा जिवंत करण्याचं काम स्वतःला नेता समजणाऱ्या लोकनेत्यांनी केले पाहिजे. शहरातील नद्या जिवंत होण्यासाठी पालिकेचे योगदान महत्वाचे आहे.
• नदीपात्रातील जमिनी पण अनेक जणांनी अनाधिकृत बळकावून पक्की बांधकाम केली आहेत त्यावर; पण संबंधित मुर्दाड प्रशासकीय यंत्रणा व पाकीटबहाद्दर, चिरीमिरीछाप नगरसेवक यांच सोईस्कर दुर्लक्ष झालं आहे.
• काहीही करा, कितीही लिहा, काहीच फरक पडणार नाही… दर रविवारी, आपले कुटुंब सोडून, करोनाच्या महाभयंकर संकट डोक्यावर असल्यावरसुद्धा श्री शर्माजी हे सुमारे एका वर्षांपासून चाळीसगांव शहरातील घाण दूर करताहेत, स्वच्छता करत आहेत, वेळोवेळी ते संबंधित यंत्रणेला जाणीव करून देत आहेत, तरीही कोणीही जागे होत नाही, शहरातील नागरिकांचे दुर्दैव या शिवाय काय म्हणणार?
– विक्रांत पाटील, जेष्ठ पत्रकार
[email protected]
08007006862 (WA)