सत्तेचे केंद्रीकरण हा संपूर्ण देशाला धोका : शरद पवार
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२२ । भाजप पक्ष देशात सत्तेचे केंद्रीकरण करीत आहे. त्यामुळे लोकशाही व देशाला धोका निर्माण झाला आहे. लोकसभेत काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या विरुद्ध करण्यात आलेला प्रकार गंभीर आहे. राष्ट्रपती यांच्या बाबत घडलेला प्रकार अतिशय चुकीचा आहे. चूक केली कोणी आणि माफी सोनिया गांधी यांनी मागावी यासाठी सभागृहात केलेला प्रकार सत्ता केंद्रीकरणचे उदाहरण आहे. असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. धुळे येथे राष्ट्रवादी काँग्रेस भवनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पवार बोलत होते.
रेल्वे स्टेशन परिसरात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल गोटे, जळगावचे ज्येष्ठ नेते ऐकनाथ खडसे, माजी मंत्री हेमंत देशमुख, धुळे जिल्हा अध्यक्ष रणजित राजे भोसले, किरण पाटील, किरण शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे खान्देशातील नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. देशातील प्रत्येक नागरिकाला सत्तेचा हक्क मिळाला पाहिजे त्यासाठी सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे स्वर्गीय महाराष्ट्रचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी पंचायत राज, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत स्तरावर सत्तेचे विकेंद्रीकरण केले. प्रत्येक नागरिकाला सत्तेचा हक्क मिळाला. भाजप सत्तेचे केंद्रीकरण करून देशाला धोका निर्माण करीत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस भवन केवळ पदाधिकारी व कार्यकर्तेचे नसून सर्व सामान्य जनतेला न्याय मिळण्यासाठी आहे. हे सर्वानी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
देशात इंग्रजीचे राज्य होते. त्यांच्या सत्तेचा सूर्य कधी मावळत नाही असे म्हटले जात होते. मात्र महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळून दिले. हा देशाचा इतिहास आहे. नवीन कार्यकर्ते, नेते निर्माण होतात. सत्ता परिवर्तन होते हे लक्षात ठेवा. यासह अनेक मुद्यावर त्यांनी आपले मत व्यक्त केले.
धुळ्यातून तीन आमदार विजय करू
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अनिल गोटे यांनी कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेस भवन लोक सहभागातून उभे केले आहे. संघटनेचे जाळे जिल्हय़ात विणले जात आहे. 10 हजार लोकांची नोंदणी करण्यात आली आहे. यंदा जिल्हय़ातून तीन आमदार विजय करून विधानसभेत पाठवू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.