16 वर्षांखालील मुलांची शिकवणी होणार बंद ; कोचिंग क्लासेसबाबत केंद्र सरकारकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी

जानेवारी 19, 2024 11:24 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जानेवारी २०२४ । पालकांसाठी एक मोठी बातमी आहे. केंद्र सरकारने कोचिंग सेंटर्सबाबत मोठा निर्णय घेतला असून याबाबत खासगी शैक्षणिक संस्थांसाठी केंद्राने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहे. त्यानुसार देशभरात १६ वर्षांखालील मुलांचे कोचिंग (शिकवणी वर्ग) बंद होणार आहे.

student

एवढेच नाही, तर त्यांना आता चांगले गुण किंवा रॅकच्या हमीची आश्वासनेही देता येणार नाहीत. खासगी कोचिंग क्लासेसच्या बेफाम वाढीला आवर घालण्यास व नियमनासाठी एका कायदेशीर चौकटीची आवश्यकता होती. या पार्श्वभूमीवर मंत्रालयाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर एक लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. तसेच कोचिंग सेंटरची नोंदणीही रद्द केली जाऊ शकते, असे सरकारने म्हटले आहे.

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, आगीच्या घटना, कोचिंग इन्स्टिट्यूटमधील सुविधांचा अभाव तसेच त्यांनी अवलंबलेल्या शिकवण्याच्या पद्धती याबबत सरकारकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यावर विचार करून शिक्षण मंत्रालयाने ही मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत.

शिक्षक मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये, कोणतीही कोचिंग संस्था पदवीपेक्षा कमी पात्रता असलेल्या शिक्षकांची नियुक्ती करणार नाही. कोचिंग संस्था पालकांना विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी, रँक किंवा चांगल्या गुणांची हमी देण्यासाठी दिशाभूल करणारी आश्वासने देऊ शकत नाहीत. संस्था 16 वर्षाखालील विद्यार्थ्यांची नोंदणी करू शकत नाहीत. माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांनी कोचिंग संस्थांमध्ये नोंदणी करावी असे म्हटले आहे.

त्याचप्रमाणे कोचिंगमध्ये अनैतिक गैरवर्तन किंवा कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषी ठरलेल्या कोणत्याही शिक्षक किंवा व्यक्तीच्या सेवा संस्थांना गुंतवू शकत नाहीत असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, या मार्गदर्शक तत्त्वांची आवश्यकता पूर्ण केल्याशिवाय कोणतीही संस्था नोंदणीकृत होणार नाही असेही सरकारने म्हटले आहे.तसेच कोचिंग संस्थांनी कोचिंगची गुणवत्ता किंवा त्यामध्ये प्रदान केलेल्या सुविधा, त्यांच्या संस्थेत शिकत असलेल्या विद्यार्थ्याने मिळवलेला निकाल, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणताही दावा करणारी दिशाभूल करणारी जाहिरात प्रकाशित करू नये असेही यात म्हटले आहे.

विद्यार्थ्यांना तणावापासून दुर ठेवण्यासाठी कोचिंग संस्थांनी पावले उचलली पाहिजेत. त्यांच्यावर अनावश्यक दबाव न आणता वर्ग आयोजित केले पाहिजेत असेही या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे. सरकारने जारी केलेल्या या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या कोचिंग संस्थांना एक लाख रुपयांपर्यंत दंड किंवा जास्त शुल्क आकारल्यास त्यांची नोंदणी रद्द केली जाऊ शकते, असेही केंद्र सरकारने म्हटले आहे. तसेच, या मार्गदर्शक तत्त्वांची अमलबजावणी योग्य रित्या होत आहे की नाही याची काळजी राज्य सरकारने घ्यावी असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now