जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२१। जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रविवार दि.१४ रोजी बालरोग व चिकित्सा विभागात दाखल बालकांच्या हस्ते केक कापून बालक दिन साजरा करण्यात आला. यावेळी बालकांना खाऊचेही वाटप करण्यात आल्याने वॉर्डातील सर्व बालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.
पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वाढदिवस बालक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बालरोग व चिकित्सा विभागात डॉक्टर व स्टाफकडून सजावट करण्यात आली. याप्रसंगी प्रभारी अधिष्ठाता तथा सूक्ष्मजीव शास्त्र विभाग प्रमुख डॉ.किशोर इंगोले, उपअधिष्ठाता डॉ.अरुण कसोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.भाऊराव नाखले, बालरोग विभाग प्रमुख डॉ.बाळासाहेब सुरोशे आदी उपस्थित होते. वॉर्डातील बालकांना तणावमुक्त वाटावे व त्यांना बरे होण्यासाठी ऊर्जा मिळावी या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते बालकांना कॅडबरी, वेफर्स व बिस्किटचे वाटप करून बाल दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. बालरोग व चिकित्सा विभागातील डॉ.गिरीश राणे, डॉ.अतुल गाजरे, डॉ.शिवहर जनकवडे, डॉ.स्नेहल पल्लोड, डॉ.निलांजना गोयल, डॉ.विश्वा भक्ता आदी उपस्थित होते. मुख्य अधिसेविका प्रणीता गायकवाड यांच्या मार्गदर्शनखाली विभाग इन्चार्ज सिस्टर्स संगीता शिंदे, परिचारिका आढळे, स्टाफ नर्स जयश्री पाटील, दीपमाला भैसे, सविता सामुद्रे, तुळसा माळी, नीलम पाटील, कल्पना मांजरेकर, कक्षसेवक, एसएमएस कर्मचारी आदींनी सहकार्य केले. प्रसंगी पालकांच्या नातेवाईकांनी डॉक्टर, परिचारिका यांचे आभार मानले.