जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सूत्रे हाती घेताच जिल्ह्याला शिस्त लावण्यासाठी धडक कारवाई सुरू केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी सायंकाळी जिल्ह्यात ‘मेगा कोम्बिंग ऑपरेशन’ राबवण्यात आले. या कारवाईत प्रथमच उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून, जिल्ह्यातील गुन्हेगारांचे आणि नियम मोडणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

पोलिसांच्या या मोहिमेत जिल्ह्यातील ५९ अत्यंत महत्त्वाच्या नाकाबंदी पॉइंट्सवर ४८ पोलीस अधिकारी आणि २१६ पोलीस अंमलदारांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक संशयित वाहनाची आणि व्यक्तीची कसून तपासणी करण्यात आली. या मोहिमेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सार्वजनिक ठिकाणी किंवा उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांविरुद्ध पुकारलेला एल्गार! पहिल्यांदाच अशा प्रकारे उघड्यावर मद्यप्राशन करताना आढळलेल्या १३ जणांवर १५ गुन्हे (केसेस) दाखल करण्यात आले आहेत. सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांना पोलिसांनी कडक इशारा दिला आहे.

वाहतूक नियमांचा बडगा; लाखांचा दंड वसूल
तपासणीदरम्यान सुमारे २१०० पेक्षा अधिक वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांकडून २ लाख ३८ हजार ६५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या घटकांवरही या मोहिमेत करडी नजर ठेवण्यात आली होती.
अधीक्षकांचा ‘दबंग’ पॅटर्न
पदभार स्वीकारल्याच्या पहिल्याच आठवड्यात श्रीकांत धिवरे यांनी राबवलेल्या या मोहिमेमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. “जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अशा मोहिमा यापुढेही सातत्याने राबवण्यात येतील,” अशी माहिती पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.







